हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासनही विसरले देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?, “बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह"

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतमालाचे भाव सातत्याने पडत आहेत. मोदींनी अमेरिकेपुढे लोटांगन घालून स्वाभिमान गहाण ठेवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे सांगतील तेच काम नरेंद्र मोदी करत आहेत. शेतकरी, तरुणांच्या प्रश्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीही देणंघेणं नाही. झोपे गेलेल्यांना जागे करने सोपे आहे, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी मात्र आसूड हाती घ्यावा लागतो, म्हणून शेतकरी विरोधी भाजपा सरकारविरोधात आसूड मोर्चा काढण्यात आला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. रविंद्र चव्हाण, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, नांदेड शहर अध्यक्ष अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार, माजी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, पप्पू पाटील कोंडेकर, बालाजी गाडे पाटील, प्रदेश सचिव श्रवण रापनवाड, धनराज राठोड यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली भरमसाठ आश्वासने दिली, शेतमालाला दिडपट भाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, १०० स्मार्ट सीटी निर्माण करणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, पेट्रोल-डिझेल ४० रुपये लिटर तर गॅस सिलेंडर ४०० रुपयांना देणार, पण सत्तेत आले आणि मोदी सर्व विसरले. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करु म्हणणारा भाजपा आता ७/१२ वरून शेतकऱ्यांचे नाव कोरे करून अदानी-अंबानीच्या नावे करण्याचा प्रयत्न करत आहे. गरज नसताना शक्तीपीठ मार्ग केला जात आहे, तो शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यासाठी आहे. दुसरीकडे तरुणांकडे डिग्री आहे पण नोकरी नाही, पेपरफुटी दरवर्षी होत आहे. लाडक्या बहिणांचा विश्वासघात केला आहे, २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले पण १५०० रुपये देतानाही ८० लाख लाडक्या बहिणांना योजनेतून वगळले आहे. भाजपा महायुतीने लाडक्या बहिणांना फसवले, तरुणांना फसवले आणि शेतकऱ्यांनाही फसवले आहे. इंधनाचे दर १०० रुपयाच्या वर गेले, गॅस सिलेंडर १००० रुपयांच्या वर गेला. जिवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या पण शेतमालाच्या किमती मात्र वाढल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपाक करताना तेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, सोने खरेदी करु नका असे आवाहन केले पण स्वतः मात्र विदेश वाऱ्या करत फिरत आहेत. मुठभर उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केली पण सर्वसामान्य जनतेला मात्र वाऱ्यावर सोडून दिले आहे. मोदींचे सरकार हे बहुजन समाज, गरिब, शेतकरी यांच्यासाठी नाही तर अदानी व अंबानीसाठीच काम करत आहे, असे सपकाळ म्हणाले. मोदी सरकार लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत आहे, पण लोकशाही व संविधानाशी खेळलात तर खबरदार, असा इशाराही यावेळी दिला.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दैवी शक्ती आहे, असे त्यांचे लोक सांगतात पण त्यांची ही तथाकथित दैवीशक्ती शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला येत नाही, ही तथाकथित दैवी शक्ती फक्त विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी कामाला येत आहे, असा टोला लगावत, ‘बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्ला’, असे म्हणाले..

नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांनीही यावेळी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करू असेही खासदार रविंद्र चव्हाण म्हणाले.

सभेनंतर जिल्हा काँग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आसूड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बैलगाडी, टॅक्टर व हाती आसूड घेऊन शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी विरोधी भाजपा सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट..

अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील शेतकरी गुनाजी बापूराव पवार यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या घरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांत्वनपर भेट दिली आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संभाषण करून मदतीसाठी तसेच तणावग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणाची सूचना केली. यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची माहिती, शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक बंद केंद्रे लवकरच सुरू करणार

शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *