काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, विद्यार्थ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक आदिवासी विद्यार्थीनिंनी पत्रकार परिषदेत सांगितली पोलिसी अत्याचाराची आपबिती..

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून मुंबईला लाँग मार्च करत विद्यार्थी आले, त्यावेळी त्यांच्यासोबत पोलीसही होते पण मुंबईत प्रवेश करत असतानाच पोलिसांनी धरपकड केली. मुंबईत या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने दादर येथील टिळक भवन व आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात राहण्याची सोय करण्यात आली होती परंतु रात्री अचानक पोलिसांनी कारवाई केली. ही पोलीस कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून केली असल्याचा गंभीर आरोप एनएसयुआय NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना एनएसयुआय NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके पुढे म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती आधीच दिली होती. नाशिकहून मुंबईपर्यंत हे विद्यार्थी आले पण आंदोलनाची परवानगी मागण्यास गेले असता त्यांना परवानगी नाकारली. या विद्यार्थ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या विद्यार्थ्यांची टिळक भवन व मुंबई काँग्रेस कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली होती. रात्री अचानक पोलिसांनी धाडसत्र सुरु केले. नवी मुंबईत काही जणांना ताब्यात घेतले. काही मुलामुलींना मारहाण करण्यात आली, एक विद्यार्थी बेशुद्ध पडला, काहींना भिवंडीला सोडून दिले. मुंबई काँग्रेस कार्यालयात झोपलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी उठवले, त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. दादरमधून काहींना उचलून नेले. पोलिसांनी एखाद्या आरोपीसारखे ताब्यात घेतले, काँग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतले. सुरुवातीला दादर पोलीस स्टेशनला घेऊन गेले, नंतर चुनाभट्टी व शेवटी कोपरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. काँग्रेस नेत्यांनी पोलिसांशी सातत्याने संपर्क साधल्यानंतर काहींना सोडून देण्यात आले.

मुंबई एसएसयुआयचे अध्यक्ष प्रद्युम यादव म्हणाले की, पोलिसांनी विद्यार्थी व मला जबरदस्तीने उचलून नेले. आधी दादर पोलीस स्टेशनला नेले, दादरमधून चुनाभट्टी पोलीस स्टेशनकडे पोहचवले, वेगवेगळ्या व्हॅन मधून घेऊन गेले, पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली.

आंदोलक विद्यार्थ्यीनींनी पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी काही सहकाऱ्यांना रस्त्यातूनच ताब्यात घेतले. टिळक भवनमध्ये अंघोळ करून बाहेर येत असतानाच बाथरूममधून पोलिसांनी ताब्यात घेतले. कुठे जायचे हे ते सांगत नव्हेत. पोलीस धमकावत होते. कोपरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले, काँग्रेस नेत्यांचा फोन आल्यानंतर शेवटी सोडले नाहीतर नाशिकला सोडणार होते. पोलीसांनी आम्हाला वॉशरुमलाही जाऊ दिले नाही, पाणीही दिले नाही. आमच्याबरोबर पोलीस व्हॅनमध्ये एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती. आंदोनस्थळी घेऊन जातो असे खोटे सांगितले. आश्रम शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, जेवण निकृष्ट दर्जाचे असते, आरोग्याच्या सुविधा नाहीत, सरकारकडे सातत्याने मागण्या करूनही केवळ आश्वासन दिले जाते असे सांगितले.

मुंबईत आमची राहण्याची सोय नाही, हॉटेलमध्ये राहण्याऐवढे पैसे नाहीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहण्याची व्यवस्था केली म्हणून काँग्रेस कार्यालयात आलो, मुख्यमंत्री महोदयांनी राहण्याची व्यवस्था केली असती तर तिकडे गेलो असतो, असेही एका विद्यार्थ्यांने सांगितले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अंडरवर्ल्डच्या धमक्या व हल्यांमुळे बॉलिवूड प्रचंड दहशतीखाली, बॉलिवूड मुंबईबाहेर हलवण्याचे षडयंत्र साबरमतीच्या जेलमध्ये बसून गुंड चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील तर पोलीस यंत्रणा व भाजपा सरकार काय करते?

मुंबईची शान असणारे बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *