विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याच्या विरोधात आणि त्यांच्या पक्षपाती वागण्यावरून विरोधी पक्षाच्या शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी उपसभापती गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आज चर्चेला आणण्यात आला. मात्र प्रस्ताव दाखल करणाऱ्या विरोधकांनाच या विषयावर बोलू न देता सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विरोधकांचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर फेटाळून लावत जिंकला.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वासदर्शक ठराव मंगळवारी सभापती राम शिंदे यांनी फेटाळल्यानंतर बुधवारी सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत मांडलेला प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. मात्र, ठरावावर बोलण्याची संधी सभापतींनी नाकारल्याने संतप्त विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकार आणि सभापतींच्या नावाने घोषणाबाजी केली. यावेळी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सभापतींचा धिक्कार असो…विधिमंडळाच्या नियमांची गळचेपी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…अशा जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी विधान परिषदेचे सभागृह दणाणून सोडले. या गदारोळात दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. दरम्यान, सभापती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
महाविकास आघाडीकडून विशेषत: शिवसेना उबाठा गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात ४ मार्च,२०२५ रोजी अविश्वासाचा प्रस्ताव विधिमंडळ सचिवांकडे सादर केला होता. मंगळवारी सभापती राम शिंदे यांनी निर्णय देताना विधिमंडळाचे अधिनियम, कायदेशीर बाबींवर बोट ठेवत हा ठराव कायदेशीर बाबी आणि अधिनियमाच्या कक्षेत बसत नसल्याचे सांगत फेटाळून लावला होता. मात्र, बुधवारी सभागृहाच्या कामकाजाच्या पत्रिकेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर सत्ताधारी पक्षाचा विश्वासदर्शक ठरावाचा कुठलाही उल्लेख नसताना भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी अचानक ही विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे, अशा आशयाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मतास टाकण्यापूर्वी विरोधी बाकावरून पोल, पोल अशी मागणी केली गेली. परंतु, विरोधकांना बोलू न देता सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव मतास टाकला आणि तो आवाजी बहुमताने मंजूर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन सभापतींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहात उडालेल्या गोंधळामुळे सभापतींनी पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
महाविकास आघाडीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात 5 मार्चला नियमाप्रामाणे अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला होता. मात्र सभापतींनी मंगळवारी तो फेटाळला. आज कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींवर विश्वास प्रस्ताव ठेवला. तसेच विरोधी पक्षनेत्याला आपली भूमिका… pic.twitter.com/DVE4x2GAyU
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 19, 2025
दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षाचे गटप्रमुख अनिल परब यांनी यांनी मागणी केली की, तुमच्याकडे बहुमत आहे. त्या आधारे तुम्हाला विश्वासदर्शक ठराव मंजूर करणार आहात. मात्र आम्हाला बोलू तरी द्या, अविश्वासदर्शक ठराव आम्ही दाखल केला आहे. त्यामुळे आम्हाला बोलू न देताच तुम्ही असा कसा ठराव मंजूर करता असा सवालही यावेळी केला.
यावेळी अंबादास दानवे यांनीही सत्ताधारी बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांना बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी केली. परंतु विरोधकांकडून बोलू देण्याची मागणी करण्यात येत असतानाही सभापती राम शिंदे यांनी विरोधकांना बोलण्याची संधी नाकारली. याशिवाय प्रस्तावावर मतदान घेण्यात यावे अशी मागणीही केली होती. मात्र सत्ताधारी पक्षाचे सभापती राम शिंदे यांनी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत विश्वासदर्शक ठराव पारित केला. काल मंगळवारीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर प्रश्नी निवेदन करत असताना शिवसेना उबाठावर टीका कर होते. त्यावेळी शिवसेना उबाठाच्या सदस्यांनी बोलू देण्याची मागणी केली होती. मात्र सभापती राम शिंदे यांनी शिवसेना उबाठाच्या सदस्यांना बोलण्याची संधीच दिली नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल!#अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab pic.twitter.com/khwxToxjAp
— Anil Parab (@advanilparab) March 19, 2025
दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडत त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली.
महाविकास आघाडीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात ५ मार्चला नियमाप्रामाणे प्रस्ताव दिला होता. मात्र सभापतींनी मंगळवारी तो फेटाळला. आज कार्यक्रमात नसताना भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींवर विश्वास प्रस्ताव ठेवला. तसेच विरोधी पक्षनेत्याला आपली भूमिका मांडू दिली नाही. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. तसेच याचा निषेध म्हणून उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार आहे. तसेच उपसभापती डायसवर बसल्यास कामकाजात सहभागी होणार नसल्याचेही यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितले.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, एकप्रकारे सत्ताधारी पक्षाला पाशवी बहुमताचा माज चढला आहे. त्यांनी विरोधकांची भूमिका मांडू न देता रेटून प्रस्ताव नेला, त्याला आम्ही विरोध केला. त्यावर आम्ही अर्धा तास घोषणा दिल्या. विरोधी पक्षाला बोलू न देणे हे लोकशाहीला बाधक आहे. लोकशाहीच्या संस्कृती व परंपरेला छेद देणारे असल्याचे ही सांगितले.
शेवटी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, तसेच डायसवर तालिका सभापती यांना बसवून या प्रकरणापासून दूर जाण्याचा प्रयत्न सभापतींनी केला. यात संबंधित अधिकारी देखील दोषी आहेत. त्यांनी नियमानुसार प्रस्ताव आणायला हवा होता. सत्ताधारीच कामकाजाचा वेळ वाया घालवत असल्याचा आरोपही प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
Marathi e-Batmya