मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही, राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर येत्या रविवारी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विषयी एका कार्यक्रमात एकाच मंचावर येणार आहेत.याची चर्चा सर्वत्र असताना आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवास स्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यामुळे उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता पसरली असून ठाकरे-आंबेडकर एकत्र येतील का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह या निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राजगृहतील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार भावना गवळी, आमदार डॉ बालाजी किणीकर, अॅड. प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित होते.

राजगृहच्या पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. यात बाबासाहेबांच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील विविध क्षण दर्शविणारी छायाचित्रे आणि त्यांनी सुरू केलेल्या ‘ जनता ‘ वृत्तपत्राचा खास अंक, सभांना संबोधित करतानांची छायाचित्रे, पुस्तकांचा संग्रह पहिल्या मजल्यावरील चित्रदालनात ठेवण्यात आली आहे.याच मजल्यावर डॉ.बाबासाहेबांच्या अभ्यासाची खोली आहे. वस्तूसंग्रह, चित्रदालन आणि अभ्यास खोलीची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी राजगृहातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या आंबेडकर कुटुंबीयांची देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेतली.

राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं मोठे भूषण आहे. त्यांनी वास्तव्य केलेले राजगृह ही वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राजगृहाची निर्मिती झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील वस्तू, छायाचित्रे आणि त्यांच्या अभ्यासाच्या खोलीची पाहणी केली. या खोलीतील वस्तू आजही त्याच स्थितीत आहेत. राजगृहाचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *