खुषखबर : राज्यातील घरगुती आणि उद्योगासाठीची वीज स्वस्त घरगुती वीज ५ ते ७ आणि उद्योग १० ते १२ टक्क्याने स्वस्त -राज्य नियामक आयोगाची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती हाताबाहेर चालल्याने विद्यमान परिस्थीती आणि भविष्यकाळाच्या दृष्टीकोनातून राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य नियामक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी घरगुती वीज दरात ५ ते ७ टक्के आणि उद्योगासाठीच्या वीज दरात १० ते १२ टक्के वीज दर कपात केल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी केली.

गेल्या १०-१५ वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळण्यास प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र शासनाच्या विद्युत कायदा २००३ नुसार हा आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त मुकेश खुल्लर आणि इक्बाल बोहरी हे सदस्य आहेत. आयोगाचा दराबद्दलचे निर्णय सर्व वीज निर्मिती, वीज पारेषण व वीज वितरण यांना बंधनकारक असतात.

आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेकरिताचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत.

मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर ७ ते ८ टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर ८ ते ९ टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर १ ते २ टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठया भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर १८ ते २० टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर १९ ते २० टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल १० ते ११ टक्क्यांनी कमी होणार आहेत.

या दरांची निश्चिती करताना सर्व संबंधितांशी प्रदीर्घ चर्चा करून आणि तपशिलवार अभ्यासाअंती आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या दर कपातीमुळे उद्योग- व्यवसाय यांना मोठा दिलासा मिळेल, ते पुन्हा नव्याने उभारी घेण्यास सज्ज होतील. ही दर कपात केवळ पुढच्या वर्षापुरती लागू राहणार नाही तर आयोगाने अशा प्रकारे इनबिल्ट पद्धत तयार केली आहे की त्यानुसार ते दर येत्या 5 वर्षापर्यंत लागू राहतील. या निर्णयामुळे शासनाला कोणताही आर्थिक भार पडणार नाही. वीज वितरण कंपन्या अधिक व्यावसायिक पद्धतीने चालवून कमी दरामध्ये ग्राहकांना वीज पुरवण्यास सक्षम असतील. तथपि वीज दरात कपात झाली आहे, म्हणून ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर न करता गरजेपुरता वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा याबाबतचा संपूर्ण निर्णय www.merc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

About Editor

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *