सोनम वांगचुक

मेदांता रूग्णालयातून सोनम वांगचुक यांचे पत्र कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिल्यास उपोषण स्थगित करण्यास तयार

सोनम वांगचुक यांनी बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी आणि परीक्षेसंबंधित मुद्द्यांवरून सोमवारी झालेल्या ‘चलो संसद‘ मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर कोणतीही शिक्षात्मक किंवा प्रतिशोधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिल्यास ते २५ व्या दिवशी सुरू असलेले आपले उपोषण संपवण्यास तयार असल्याचे जाहिर केले.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, सोनम वांगचुक यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांची भेट घेतल्याबद्दल आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. सोनम वांगचुक यांनी सांगितले की, मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे, की सरकार दोन प्रमुख मागण्यांवर सकारात्मक विचार करेल – परीक्षा पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी भरपाई आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या विचारासह उत्तरदायित्वावर संसदेत अर्थपूर्ण चर्चा.

२० जुलै रोजीचा ‘चलो संसद‘ (संसदेकडे मोर्चा) शांततापूर्ण होता असे वर्णन करताना, ५९ वर्षीय सोनम वांगचुक यांनी आरोप केला की, शिस्त पाळूनही आंदोलकांना पोलिसांकडून “अत्याचार आणि अवाजवी बळाचा वापर” सहन करावा लागला.

“या आंदोलनात सहभागी झालेल्यांविरुद्ध कोणत्याही कायदेशीर खटल्यांमुळे, छळामुळे किंवा सूडबुद्धीने केलेल्या कारवाईमुळे लोकशाही संस्थांवरील माझा विश्वास आणखी डळमळीत होणार नाही, अशी मी मनापासून आशा करतो,” असे त्यांनी लिहिले.

सोनम वांगचुक म्हणाले की, विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ६५ खासदारांनी त्यांची भेट घेतली होती किंवा त्यांना पत्र लिहून उपोषण संपवण्याचा आग्रह केला होता. तथापि, या आंदोलनात सामील झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संरक्षणाची हमी दिल्याशिवाय आपण हे आंदोलन सोडू शकत नाही, असे ते म्हणाले.

सोनम वांगचुक पुढे बोलताना म्हणाले की, मला जगायचे आहे. मला माझ्या विद्यार्थ्यांकडे, शिक्षणाकडे आणि ज्या कामामुळे माझे आयुष्य घडले आहे, त्या कामाकडे परतायचे आहे. पण ज्या तरुण पिढीसाठी हे आंदोलन सुरू झाले, त्यांच्या जीवावर मी हे करू शकत नाही, असे ही यावेळी स्पष्ट केले.

सोनम वांगचुक यांनी सरकारला आवाहन केले की, आंदोलनातील कोणत्याही सहभागीवर कायदेशीर कारवाई किंवा सूड उगवला जाणार नाही, याची निःसंदिग्ध हमी द्यावी. “न्याय्य आणि उत्तरदायी शिक्षण व्यवस्थेसाठी आवाज उठवणे, हाच त्यांचा एकमेव ‘गुन्हा‘ आहे,” असे ते म्हणाले.

या ५९ वर्षीय सोनम वांगचुक यांनी सांगितले की, असे आश्वासन मिळाल्यास ते तात्काळ उपोषण संपवतील. त्यांच्या मते, हे या गोष्टीचे द्योतक आहे की, सरकारने केवळ त्यांचेच नव्हे, तर लाखो तरुणांच्या आकांक्षाही ऐकल्या आहेत. मात्र, असा इशारा दिला की, असे आश्वासन न मिळाल्यास त्यांना हे उपोषण अनिश्चित काळासाठी ‘सुरू ठेवण्यास भाग पडेल‘.

आंदोलकांवर यापुढे पोलिसांकडून अतिरिक्त बळाचा वापर होणार नाही, अशी आशाही सोनम वांगचुक व्यक्त केली. “आपल्या लोकशाहीचे भवितव्य हे तिच्याशी सहमत असलेल्यांना ती कशी वागणूक देते यावर अवलंबून नाही, तर जेव्हा तिचे तरुण नागरिक धैर्याने, आशेने आणि दृढ विश्वासाने बोलण्याचे धाडस करतात, तेव्हा ती त्यांना कशी वागणूक देते यावर अवलंबून आहे,” असे ते म्हणाले.

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी ६ जून रोजी जंतर मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला, सोनम वांगचुक यांनी २८ जून रोजी आंदोलनात सामील होऊन उपोषण सुरू केल्यानंतर गेल्या काही दिवसांत जोर चढला आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

सोनम वांगचुक यांना त्यांच्या उपोषणाच्या २१ व्या दिवशी, १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर येथील आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात हलवले. मंगळवारी, सफदरजंग रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांना आव्हान देणाऱ्या त्यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर, न्यायालयाने त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले.

About Editor

Check Also

Artificial Intelligence name changed to Super Intelligence

Super Intelligence : एआयचे नाव बदलले! आता ते या नावाने ओळखले जाईल मस्क, पिचाई आणि झुकरबर्ग यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांचा मोठा निर्णय

Super Intelligence: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या आणि ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *