कल्पकता म्हणजे तो गुण, जो अभियंत्याला एखाद्या समस्येकडे पाहताना केवळ ‘जे आहे’ ते नव्हे, तर ‘जे होऊ शकते’ ते दाखवतो. हाताशी असलेल्या साधनांचा असा वापर करण्याची शक्ती, जो यापूर्वी कुणाच्या मनातही आला नव्हता. किंवा मुळात नवीच साधने घडवण्याची शक्ती.
पुलीची (कप्पीची) कथा पाहा. शतकानुशतके माणसाला जे उचलता येईल त्याची मर्यादा त्याच्या स्वतःच्या स्नायूंच्या बळापुरतीच होती. पण एका कल्पक अभियंत्याने दोरी आणि चाक यांच्याकडे पाहिले, आणि त्यात बळाची कैकपटीने वाढ करणारे यंत्र त्याला दिसले. या एकाच साध्या साधनाने शक्यतेच्या सीमा विस्तारल्या.
इतिहासभर हीच वृत्ती अभियांत्रिकीच्या पराक्रमांना प्रेरणा देत आली आहे. अजिंठ्याच्या कातळकोरीव लेण्यांपासून भोरघाटच्या रेल्वेमार्गापर्यंत, वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या उत्तुंग कमानींपासून नागपूरच्या वस्त्रोद्योगाच्या मागांपर्यंत, कोयनेच्या जलविद्युत बोगद्यांपासून अरबी समुद्राच्या किनारी पहारा देत उभ्या असलेल्या तारापूरच्या अणुभट्ट्यांपर्यंत – ही सारी कल्पकता काय साध्य करू शकते याची मूर्त प्रमाणे आहेत. अभियांत्रिकी वृत्ती मानवजातीला कोठवर नेऊ शकते, याची साक्ष.
आज हीच वृत्ती एका नव्या क्षितिजाला गवसणी घालत आहे – कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). एआय अभियंते आजवरच्या सर्वांत गुंतागुंतीच्या आव्हानांशी झुंज देत आहेत. शिकणाऱ्या, परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आणि एकट्या माणसाला अशक्य असे शोध लावणाऱ्या प्रणाली ते रचत आहेत. ही सर्वाधिक अमूर्त सीमारेषेवर वापरलेली कल्पकता आहे. आज ज्याच्याकडे विषयाचे सखोल ज्ञान आणि एआयची वर्गणी आहे, असा कोणीही उत्पादन घडवू शकतो. त्यासाठी एकच अट – कल्पकता.
अभियांत्रिकीला तांत्रिक प्रावीण्याइतकीच सर्जनशीलताही लागते. समस्या सोडवण्याच्या देणगीइतकीच प्रश्न विचारण्याची आवडही लागते. हेच गुण अभियांत्रिकी वृत्तीची व्याख्या करतात.
आणि हेच गुण भारताच्या श्रेष्ठ अभियंत्यांपैकी एक, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, यांच्या ठायी मूर्त झाले होते. १८६० साली आजच्याच दिवशी जन्मलेल्या विश्वेश्वरय्या यांनी दख्खनला उद्ध्वस्त करणाऱ्या पावसाळी पुरांकडे पाहिले आणि कृष्णराजसागर धरण उभारले. आपत्तीचे रूपांतर शेतीत करणारी एक कल्पक व्यवस्था. त्यांनी दुर्गम पश्चिम घाटांकडे पाहिले आणि इतकी नावीन्यपूर्ण रेल्वे-बोगदा प्रणाली उभारली, की ती जगासाठी आदर्श ठरली.
आज विश्वेश्वरय्या यांचा गौरव करताना आपण त्यांच्या ठायी वसलेल्या कल्पकतेच्या वृत्तीचा गौरव करत आहोत. कारण पुली पासून एआयपर्यंत आपल्याला घेऊन आलेला एकच शब्द आहे, प्रत्येक अभियंत्याच्या हृदयात वसणारी – कल्पकता.
लेखक-आदित्य सुवर्णा सुदिन गायकवाड
यंग प्रोफेशनल, महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA)
Marathi e-Batmya