मोदींवरील टीकेवेळी मेलोनी यांचा संदर्भ, सरकारची राहुल गांधी यांना सूचना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी इटलीशी संबध विस्तारले असल्याची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख केल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी राजनैतिक संवादात परस्पर आदराची अपेक्षा व्यक्त केली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात भारताचे इटलीसोबतचे संबंध “सर्वच बाबतीत” विस्तारले आणि बळकट झाले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांबद्दल आदर बाळगणे आवश्यक आहे.

पुढे बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, इटलीसोबत आमचे दृढ संबंध आहेत. अलीकडच्या काळात इटलीसोबतचे आमचे संबंध सर्वच बाबतीत विस्तारले आणि बळकट झाले आहेत. राजनैतिक प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एकमेकांचा आदर राखून आणि दोन्ही बाजूंमधील परस्पर समजूतदारपणा लक्षात घेऊन हे संबंध अधिक दृढ करणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.

नवी दिल्लीतील ‘रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशना’त राहुल गांधी यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनाची खिल्ली उडवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही प्रतिक्रिया आली. परराष्ट्र धोरण म्हणजे “नेत्यांना मिठी मारणे” ही कल्पना कुठून आली, हे आपल्याला समजले नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते.

त्यानंतर आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी राहुल गांधी यांनी मंचावरच संदीप दीक्षित यांना मिठी मारली. त्यांची अज्ञानता बघा… परराष्ट्र धोरण म्हणजे नेत्यांना मिठी मारणे, ही कल्पना त्यांना कुठून सुचली? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

त्यानंतर संदीप दीक्षित यांनी राहुल गांधी यांना विचारले, एक गोष्ट विचारू शकतो का? मेलोनी समजून तर मिठी मारली नव्हती ना?
राहुल गांधी यांनी उत्तर दिले, मी अजून त्या टप्प्यावर पोहोचलेलो नाही.

या संवादात जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख होता, ज्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे राजनैतिक संबंध राखले आहेत.
जयस्वाल यांनी त्या राजकीय संवादावर थेट भाष्य करण्याऐवजी भारत-इटली संबंधांच्या व्यापक पैलूंवर लक्ष केंद्रित केले.

रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात द्विपक्षीय संबंध वाढले आणि बळकट झाले आहेत, ज्यामुळे परस्पर आदर आणि समजूतदारपणा हा राजनैतिक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

“आम्हाला हे संबंध अधिक दृढ करायचे आहेत,” असे सांगत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, दोन्ही देशांनी “एकमेकांचा आदर राखून” आपले संबंध अधिक दृढ करणे सुरू ठेवले पाहिजे.

काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर केलेली टीका आता एका मोठ्या राजकीय वादात रूपांतरित झाली आहे, ज्यामध्ये भाजपने राहुल गांधी यांच्यावर राजकीय संवादाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला.

राहुल गांधी यांनी या अधिवेशनात मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि परदेशी नेत्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांनाच ‘परराष्ट्र धोरण’ मानल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांच्यावर केला होता. त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यपद्धतीशी केली; तसेच अमेरिकेसोबतच्या इंदिरा गांधींच्या संवादाची आठवण करून देत, भारताचे परराष्ट्र धोरण हे देशाच्या हितावर आधारित असावे, असे प्रतिपादन केले.

“ते (इतर नेते) माझे मित्र आहेत, ही कल्पना पंतप्रधान मोदी यांच्या मनात कुठून आली? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
त्यांनी अमेरिका-इराण संघर्षाचाही उल्लेख केला आणि सांगितले की, या दोन देशांमध्ये मध्यस्थी करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकला असता.

“अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाले होते. अशा परिस्थितीत, जर इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते, तर आपल्याकडे एक मोठी संधी चालून आली असती. कारण इराण हा आपला जुना मित्र आहे आणि अमेरिका व रशिया हे देखील आपले मित्र आहेत; त्यामुळे आपण त्यांच्यात मैत्री घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करू शकलो असतो. पण पाकिस्तानने यात पुढाकार घेत आपली जागा घेतली आणि नरेंद्र मोदी मात्र केवळ बघत राहिले,” असे ते म्हणाले.

भाजप-आरएसएसचे वर्णन ‘विदूषकांचा समूह’ (bunch of jokers) आणि ‘जोकर्स’ (clowns) असे केल्याबद्दल भाजपने राहुल गांधी यांच्यावर कडक टीका केली.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधी यांच्यावर राजकीय चर्चेची मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला, तर इतर भाजप नेत्यांनीही जॉर्जिया मेलोनी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर टीका केली.

या राजकीय वादावर आता परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) प्रतिक्रिया दिली आहे. इटलीसोबतचे भारताचे संबंध आणि परस्पर आदराचे महत्त्व अधोरेखित करत, दोन्ही देश आपले संबंध अधिक दृढ करत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

About Editor

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांनी ज्या ठिकाणी भाषण केले त्या ठिकाणाचे भाजपा समर्थकांकडून शुद्धीकरण उत्तराखंडमधील श्री राम सेना संघटनेचे काम, अशा घटनांना भाजपचा पाठिंबा नाही

भाजपशासित उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्या ठिकाणी सभेला संबोधित केले होते, त्या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *