मल्लिकार्जून खर्गे यांनी ज्या ठिकाणी भाषण केले त्या ठिकाणाचे भाजपा समर्थकांकडून शुद्धीकरण उत्तराखंडमधील श्री राम सेना संघटनेचे काम, अशा घटनांना भाजपचा पाठिंबा नाही

भाजपशासित उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्या ठिकाणी सभेला संबोधित केले होते, त्या ठिकाणी ‘शुद्धीकरण’ विधी पार पडल्याचे सांगितल्यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. मल्लिकार्जून खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी या घटनेला “दुर्दैवी” म्हटले आणि भाजप अशा उपक्रमांना पाठिंबा देत नाही, असे सांगितले.

या मुद्द्यामुळे उत्तराखंडमध्ये आधीच राजकीय खळबळ उडाली आहे, जिथे हल्द्वानीच्या रामलीला मैदानातील विधीवरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका-करत आहेत. दलित असलेले मल्लिकार्जून खर्गे यांनी त्या ठिकाणी जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर दोन दिवसांनी एका उजव्या विचारसरणीच्या संघटनेने हा विधी आयोजित केला होता. गुरुवारी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, हा मुद्दा राज्यसभेत पुन्हा गाजला.

कामकाजाला सुरुवात होताच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आरोप केला की, ८ ऑगस्ट रोजी ज्या व्यासपीठावरून त्यांनी सभेला संबोधित केले होते, त्या व्यासपीठावर भाजप कार्यकर्त्यांनी ‘हवन’ करून ‘शुद्धीकरण’ केले. त्यावेळी लाखो लोक उपस्थित होते. मी कोणत्याही समाजाचे किंवा धर्माचे नाव घेतले नाही. मी फक्त तेथील लोकांच्या समस्यांबद्दल बोललो. पण माझ्या भाषणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी हवन केले, असे सांगितले.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, लोकशाहीत हीच का पद्धत? तुम्ही संविधानाचे रक्षण कसे करत आहात? मी विरोधी पक्षनेता आहे… मला या मुद्द्यांचे राजकारण करायचे नव्हते, असे काँग्रेसचे नेतृत्व करणारे दुसरे दलित नेते खर्गे म्हणाले.

काँग्रेस खासदारांच्या जोरदार घोषणाबाजीदरम्यान, राज्यसभेच्या अध्यक्षांनी ‘अस्पृश्यते’पेक्षा जगात मोठे पाप नाही, यावर जोर देत मल्लिकार्जून खर्गे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध झाला पाहिजे… ज्यांनी हे केले आहे त्यांना पकडले पाहिजे. यावर दोन मते नाहीत, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी या घटनेपासून भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खर्गे यांना आश्वासन दिले की या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कृपया वारंवार असे म्हणू नका की आम्ही (भाजपने) केले. भाजप अशा कृत्यांना पाठिंबा देत नाही, असे सांगितले.

जे पी नड्डा पुढे बोलताना म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासन देतो की तिथे जे काही घडले त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल. (भाजपचे) राष्ट्रीय अध्यक्ष याकडे लक्ष देतील. तुमच्या भावना दुखावल्या गेल्या याचे आम्हा सर्वांना खूप दुःख आहे, असे म्हणाले.

यावर, मल्लिकार्जून खर्गे यांनी जोर देऊन सांगितले की, ते या घटनेसाठी कोणालाही दोष देत नाहीत. मी म्हणतोय की गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा… ही आमची मागणी आहे, असे सांगितले.

मात्र, हे प्रकरण उत्तराखंडमध्ये एका मोठ्या राजकीय वादात बदलले आहे. ‘शुद्धीकरण’ सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक पुजारी वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात हवन करताना दिसत आहे.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, आयोजकांपैकी एक जण म्हणतो की त्या जागेला धार्मिक महत्त्व आहे आणि ती जागा राजकीय नव्हे, तर केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच राखीव ठेवली पाहिजे. या विधीचे समर्थन करताना, संघटनेचे सदस्य गिरीश चंद्र पांडे म्हणाले की, मल्लिकार्जून खर्गे यांच्या सभेत दिलेल्या काही घोषणा इस्लामिक घोषणांसारख्या वाटत होत्या.

उत्तराखंड काँग्रेसचे प्रमुख गणेश गोडियाल यांनी आरोप केला की, हा विधी श्री राम सेना गटाने केला होता, जो भाजपशी संबंधित असल्याचा दावा केला. भाजपने हा आरोप फेटाळला.

गणेश गोडियाल यांनी दावा केला की, मल्लिकार्जून खर्गे दलित समाजाचे असल्यामुळे हा विधी करण्यात आला आणि समाजात जातीय विभागणी निर्माण केल्याचा आरोप भाजपवर केला.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. ही मानसिकता भाजप आणि आरएसएसची विचारसरणी स्पष्टपणे दर्शवते. याचा धिक्कार झालाच पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.

या घटनेवर आरजेडीकडूनही टीका झाली, ज्यांनी अशा “जातीयवादी कट्टरतावाद्यांना” पोसल्याबद्दल भाजपला जबाबदार धरले. एक दलित देशाच्या अग्रगण्य नेत्यांपैकी एक आहे, हे मनूच्या क्रूर संततीला सहनच होत नाही, असे आरजेडीच्या प्रवक्त्या प्रियांका भारती यांनी ट्विट केले.
मात्र, भाजपने या कार्यक्रमाच्या आयोजकांशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले.

मात्र, उत्तराखंडचे मंत्री आणि भाजपचे प्रवक्ते खजन दास यांनी आरोप केला की, खर्गे यांच्या सभेत दिलेल्या काही घोषणांमुळे सनातन समाजाच्या “भावना दुखावल्या” असतील, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले.

त्यांनी यावर जोर दिला की रामलीला मैदान हे धार्मिक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि तिथे दुसऱ्या धर्माशी संबंधित घोषणाबाजीमुळे लोक संतप्त झाले असतील.

About Editor

Check Also

सरन्यायाधीश सुर्यकांत यांना निमंत्रित करण्यास विरोध, बीसीआयची थेट विद्यार्थ्यांच्या वकिल नोंदणीवर बंदी हैद्राबादच्या नालसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर बंदीची बीसीआयचा निर्णय

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांना निमंत्रित करण्याच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *