Breaking News

श्रीदेवीवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार पद्मश्रीमुळे नाही, तर मुख्यमंत्र्यांमुळे राज शिष्टाचार विभागाने माहिती अधिकारात माहिती दिल्याचा अनिल गलगलींचा दावा

मुंबई : प्रतिनिधी

दुबईत चित्रपट अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर करण्यात आलेले शासकिय इतमामातील अत्यंसंस्कार हे त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे झाल्याची माहिती पुढे आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे शासकीय इतमामात श्रीदेवी यांचे झालेल्या अंत्यसंस्कार आणि याबाबत ज्यास अधिकार आहेत त्याची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री प्रमुख असलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार खात्याने अनिल गलगली यांस कळविले की शासकीय इतमामाने, कोण कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे याबाबतचे अधिकार मुख्यमंत्री महोदयाना आहेत. दिवंगत अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याबाबत २५ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्यमंत्री सचिवालयाकडून मौखिक निर्देश प्राप्त झाल्यानुसार २६ फेब्रुवारी २०१८ च्या शासन पत्रानुसार कार्यवाही करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांस कळविण्यात आले.

या माहितीची विचारणा करण्याच्या प्रयोजनाबाबत अनिल गलगली यांस विचारणा केली असता गलगली म्हणाले की ‘ श्रीदेवी हिच्या मृत्युनंतर जेव्हा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा सांगितले जात होते की, ज्यांस पद्मश्री दिली जाते त्या व्यक्तीचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात, याची पुष्टी करण्यासाठी माहिती विचारली होती. पण यात पद्मश्री असल्याने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतात याची पुष्टी झाली नाही. उलट हे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याची नवीन माहिती समोर आली आहे’.

४० व्यक्तींवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

२२ जून २०१२ ते २६ मार्च २०१८ याकालवाधीत एकूण ४० मान्यवरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नावांची यादी पुढीलप्रमाणे

श्रीदेवी व्यतिरिक्त श्रीमती मृणाल गोरे, माजी खासदार (१७-७-२०१२), विलासराव देशमुख,  माजी केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री (१४-८-२०१२), प्रभाकर कुंटे, माजी मंत्री (१५-८-२०१२), कृष्णराव देसाई ऊर्फ बाबासाहेब कुपेकर, माजी विधानसभा अध्यक्ष (२६-९-२०१२), शंकरराव देवराम काळे, माजी राज्यमंत्री (५-११-२०१२),  बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख (१७-११-२०१२), लक्ष्मण रंगनाथ हातणकर, माजी राज्यमंत्री (२२-११-२०१२), शंकरराव जगताप, माजी विधानसभा अध्यक्ष (१०-१२-२०१२), दिनकर बाळू पाटील, माजी खासदार  ( २४-६-२०१३), सहकार महर्षी छत्रपाल उर्फ बाबासाहेब आनंदराव केदार, माजी राज्यमंत्री (०२-०८-२०१३), रजनी रॉय, माजी नायब राज्यपाल, पाँडेचरी (२९-८-२०१३), सत्यनारायण गोएंका, विपश्यना गुरुजी (२९-९-२०१३), मोहन धारिया, माजी केंद्रीय मंत्री (१४-१०-२०१३), सुभाष झनक, माजी मंत्री (२८-१०-२०१३), सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन, बोहरा धर्मगुरु ( १७-१-२०१४), दत्तात्रय नारायण पाटील, माजी आमदार (२८-२-२०१४) , अ.र.अंतुले, केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री (०२-१२-२०१४), आर.आर. पाटील, माजी उप मुख्यमंत्री (१६-२-२०१५), गोविंदराव वामनराव आदिक, माजी मंत्री (०७-०६-२०१५), डॉ. सय्यद अहमद, राज्यपाल, मणिपूर (२७-९-२०१५) , रामभाऊ कापसे,अंदमान व निकोबारचे माजी नायब राज्यपाल ( २९-९-२०१५),  मदन विश्वनाथ पाटील, माजी कॅबिनेट मंत्री (१६-१०-२०१५), प्रमोदबाबू भाऊरावजी शेंडे, माजी विधानसभा उपाध्यक्ष (१४-११-२०१५), शरद जोशी, माजी खासदार व शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष  (१२-१२-२०१५), मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ कवीवर्य (३०-१२-२०१५), डॉ.दौलतराव आहेर, माजी आरोग्यमंत्री (१९-१-२०१६), डॉ. भवरलाल जैन, जैन इरिगेशन समूहाचे संस्थापक (२५-२-२०१६),  निहाल मौलवी मो. उस्मान अहमद  माजी मंत्री (२९-२-२०१६), निवृत्त नामदेव ऊर्फ बापूसाहेब थिटे,माजी खासदार व राज्याचे गृह राज्यमंत्री (१९-०३०२०१६),  बाबूराव महादेव भारस्कर, माजी समाजकल्याण मंत्री (०१-०५-२०१६), मनोहर ऊर्फ बाबासाहेब गोपले, मातंग समाजाचे नेते (२१-८-२०१६), श्रीमती जयवंतीबेन मेहता, माजी केंद्रीय राज्यमंत्री (०७-११-२०१६), मधुकरराव किंमतकर, माजी अर्थ राज्यमंत्री  (०३-०१-२०१८), वसंत डावखरे, विधानपरिषदेचे माजी सभापती (०५-०१-२०१८),  प्रा. नारायण सदाशिव फरांदे, विधानपरिषदेचे माजी सभापती (१६-०१-२०१८), ॲड. चिंतामण वनगा, लोकसभा सदस्य (३०-१-२०१८), मुझफ्फर हुसेन, ज्येष्ठ पत्रकार (१३-०२-२०१८), डॉ. बी. के. गोयल, पद्मविभूषण (२०-०२-२०१८) आणि डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री (०९-०३-२०१८) यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत