फेस्टिवल ऑफर : बँक ऑफ इंडियाकडून गृह, वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात प्रक्रिया शुल्कही नाही

मुंबईः प्रतिनिधी
सणासुदीच्या काळात बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहन कर्जावर सूट जाहीर केली आहे. बँकेने आपल्या गृह कर्जावरील व्याजदरात ०.३५ टक्के कपात केली आहे. या कपातीनंतर, बँकेचे गृहकर्ज दर ६.५० टक्क्यापासून सुरू होईल.
हा विशेष दर १८ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू असेल. व्यतिरिक्, बँकेने वाहन कर्जावरील व्याज दरात ०.५० टक्के कपात केली आहे. यानंतर आता बँकेच्या वाहन कर्जावरील व्याज दर ७.३५ टक्क्यांवरून ६.८५ टक्क्यांवर आला आहे. बँकेने ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत गृह आणि वाहन कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कर्जासाठी आणि कर्जाच्या हस्तांतरणासाठी अर्ज करणारे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतील.
देशातील अनेक बँका या दिवसांमध्ये गृहकर्जावर विशेष ऑफर देत आहेत. बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँक फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत ६.५० टक्के दराने गृहकर्ज देत आहेत. तर एसबीआयचा गृहकर्जाचा व्याजदर ६.७० टक्के आहे.
बँक ऑफ बडोदाने सणासुदीच्या काळात गृहकर्जाचा व्याजदर ६.५० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. नवीन कर्जाव्यतिरिक्त नवीन व्याजदराचा लाभ इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जावरही उपलब्ध होईल. या ऑफरचा लाभ ३१ डिसेंबरपर्यंत मिळेल.
कोटक महिंद्रा बँकेने या सणासुदीच्या काळात गृह कर्जाच्या व्याजदरात ०.१५ टक्के कपात केली आहे. आता गृहकर्जासाठी नवीन व्याज दर ६.५० टक्के असेल. ही ऑफर ८ नोव्हेंबरपर्यंत वैध असेल. नवीन व्याज दर नवीन गृहकर्ज तसेच इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जांवर लागू होतील.
आयसीआयसीआय बँकेने फेस्टिव्ह बोनान्झा सादर केला आहे. यामध्ये गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क फक्त १,१०० रुपये असेल. बँकेकडून गृह कर्ज ६.७० टक्के व्याजाने उपलब्ध होईल. बँकेने सांगितले की, १ ऑक्टोबरपासून ग्राहक उत्सवाच्या बोनान्झा अंतर्गत ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकाने इतर कोणत्याही बँकेचे कर्ज हस्तांतरित केले तरी त्याला हा लाभ मिळेल.
सणांचा हंगाम पाहता एचडीएफसीने गृह कर्जाचे दर कमी केले आहेत. या अंतर्गत ग्राहक प्रारंभिक ६.७० टक्के वार्षिक व्याज दराने गृह कर्ज घेऊ शकतील. ही विशेष योजना ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने २ कोटी रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी गृहकर्जाचा दर ६.६६ टक्के केला आहे. ही ऑफर ३० नोव्हेंबरपर्यंत घेतलेल्या गृहकर्जावरच लागू होईल.

About Editor

Check Also

कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल किंमतीत वाढ मात्र बाजार २५०० अंशाने घसरला निफ्टी बाजारही घसरणीला

तेलाच्या किमती वाढल्याने आणि एचडीएफसी बँकेबद्दलच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाल्याने, गुरुवारी दलाल स्ट्रीटवर विक्रीची नवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *