उध्दव ठाकरे म्हणाले, सीमाप्रश्नाची बैठक फक्त १५ मिनिटात झाली? सीमाप्रश्नी होयबा मुख्यमंत्री दिल्लीची वाट पहात होते का?

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. मात्र ही बैठक फक्त १५ मिनिटात आटोपल्याबाबतचा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून विचारला असता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयावरची बैठक फक्त १५ मिनिटात कशी काय पार पडली?. असो त्या बैठकीत काय ठरले ते ठरले. पंरतु अमित शाह यांनी आम्हा विरोधी पक्षांची नावे घेत आवाहन केले आहे. मात्र आम्ही याप्रश्नावर राजकारण करत नसल्याचे स्पष्ट केले.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, बेळगावातील मराठी बांधवांवर पोलीस कारवाई झाली. महाराष्ट्रातील वाहनांना प्रत्यक्ष बंदी केली. गेले पंधरा वीस दिवस हा प्रश्न चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिल्लीतल्या बैठकीत आपले ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याचा खुलासा केला आणि आपल्या होयबा मुख्यमंत्र्यांनी तो मान्य केला. तुमचे व्टिटर अकाऊंट हॅक केले त्याचा खुलासा करायला इतके दिवस का लागले? दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यापर्यंत हा खुलासा का थांबला होता असा खोचक सवालही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केला.

१७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकार आणि महापुरुषांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य कऱणाऱ्यांच्या विरोधात हा महामोर्चा काढण्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी या शासकिय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शनिवारी होणाऱ्या मोर्चात आम्ही महाराष्ट्र प्रेमी म्हणून उतरत आहोत. सरकार जर महाराष्ट्राचे आहे आणि ते सरकार महाराष्ट्राची बाजू मांडत नाही म्हणून विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत आहे. महाराष्टाची बाजू न मांडणारे असे मग विरोधी कोण आणि सत्ताधारी कोण? म्हणून महाराष्ट्र प्रेमी हा शब्द महत्वाचा आहे. महाराष्ट्राचे प्रेम जसे आमच्यात आहे तसे सरकारमध्ये आहे का नाही याचे उत्तर कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून बुधवारी दिल्लीतील संसद भवनात गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची महत्वपूर्ण बैठक झाली. दिल्लीच्या बैठकीत असे वेगळे काय घडले? बोम्मईं यांनी बैठकीत बोम्मई यांनी आपल्या नावाने बनावट अकाउंटवरून महाराष्ट्रसंबंधी वादग्रस्त ट्वीट करण्यात आले असा खुलासा केला. त्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त होयबा केले. ट्वीटर हॅक झाले होते तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला हवे होते. आपल्या ट्वीटरवरून कोण काय बोलते याचा खुलासा करायला दिल्लीच्या बैठकीची वाट पहात बसला होता का? अशी टीका त्यांनी केली.

गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना दोन्ही राज्यांनी काही करु नये, हा दिलेला सल्ला काही नवीन नाही. असे असेल तर मग सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा आधी दिला होता की त्यापूर्वी दिला होता? विधानसभेचे अधिवेशन त्यापूर्वीपासून सुरु आहे का की नंतर सुरु झाले? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत केवळ महाराष्ट्रानेच थांबायचे का या सर्व गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे. केवळ बैठकीला जाऊन ‘पोहे’ खाऊन निघणार असाल तर त्याला काही अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला.

About Editor

Check Also

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *