महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बसेसना ‘ हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे जणू चालते-बोलते प्रतीक ठरणार आहेत.
इतिहासाचा सन्मान, प्रवासात आराम
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब! त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटी च्या नवीन बसेसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण केले आहे. अर्थात, एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेसना यापूर्वी गौरवले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अधिक आसन क्षमता — प्रवाशांना मोठा दिलासा
प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, सध्याच्या बसेसची आसन क्षमता साधारण ४० प्रवासी इतकी असताना, नव्या बसेसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गांवर उभे राहणाऱ्या तब्बल १५ प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे, असेही सांगितले.
परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “राजमाता जिजाऊ” हे नाव केवळ नामकरण नाही, तर स्वराज्याच्या संस्कारांचा, मातृशक्तीच्या प्रेरणेचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीच्या बांधिलकीचे एक सन्मानचिन्ह आहे. लवकरच इतिहासाच्या साक्षीने सजलेल्या या बसेस आधुनिक सुविधांसह महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील असे सांगितले.
Marathi e-Batmya