एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राचे ‘महा ऑलिंपिक’ ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा शुभारंभ

नेहमी कायदा-सुव्यवस्थेसाठी रस्त्यावर खंबीरपणे उभे राहणाऱ्या पोलिसांना आज क्रीडांगणावर खेळाडूंच्या पोशाखात पाहून अभिमान वाटतो. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘महा ऑलिंपिक’ असून, या स्पर्धेतून पोलीस दलाची ताकद, शिस्त आणि क्रीडा कौशल्य जगासमोर यावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कलिना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा शुभारंभ झाला.

राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात स्पर्धामध्ये सहभागी पथकांनी शिस्तबद्ध संचलन केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विलेपार्ले येथील पार्लेकर महिला ढोल ताशा पथकाने विशेष सादरीकरण केले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृह राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ‘महा ऑलिंपिक’ असून, पोलिसांनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस हे सर्वोत्कृष्ट असल्याचे जगाला दाखवून द्यावे. नेहमी खाकी वर्दीत रस्त्यावर, मोर्चे-आंदोलन, सण-उत्सवात कर्तव्य बजावणारे पोलीस आज खेळाडूंच्या पोशाखात मैदानावर उतरलेले पाहून आनंद आहे. खेळात हार-जीत होणे हे स्वाभाविक आहे. सतत प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे. या स्पर्धांमुळे पोलीस दलातील संघभावना, खेळाडू वृत्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती अधिक बळकट होईल, असे सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी, महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर, विशेषत: पोलीस क्रीडा स्पर्धांत सुवर्णपदकांसह अनेक पदके मिळवत राज्याची मान उंचावल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पुढील काळात राष्ट्रीय पातळीबरोबरच ऑलिंपिक स्पर्धांमध्येही राज्यातील पोलिस खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.

पोलिसांच्या सेवाभावाचा गौरव करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था राखताना पोलिसांवर सर्वाधिक ताण येतो, तरीही ते ऊन-वारा-पावसात, सण-उत्सवात, मोर्चा-आंदोलनात सतत रस्त्यावर असतात. अशा तणावपूर्ण कामाच्या पार्श्वभूमीवर या क्रीडा स्पर्धा पोलिसांचा मानसिक ताण कमी करतात, थकवा दूर करतात आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी यांच्यातील मैत्री व सामूहिकता वृद्धिंगत करतात.

मुंबईला देशाचे ग्रोथ इंजिन संबोधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सुदृढ कायदा-सुव्यवस्थेमुळेच गुंतवणूक, व्यापार, उद्योग आणि शिक्षण-कला-संस्कृतीचा सर्वांगीण विकास शक्य होतो. राज्यातील गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढले असून, सुमारे ९० टक्के प्रकरणांमध्ये ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले जात असल्याने पोलिसांवरचा जनतेचा विश्वास वाढत आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पोलिसांसाठी दर्जेदार घरे, गृहनिर्माण प्रकल्पांमधून घरांची तरतूद, सुसज्ज पोलीस स्टेशन, आधुनिक शस्त्रे, वाहने आणि सायबर सुरक्षेसाठी आवश्यक प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. गृह विभाग आणि गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेगाने काम सुरू असल्याचेही सांगितले.

क्रीडा स्पर्धासोबतच पोलीस बँड, संगीत, लेखन आणि सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पोलिसांच्या कलागुणांचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गौरव केला. ‘मैं खाकी हूं’ या कवितेच्या ओळी सादर करून, वादळ-वाऱ्यात सज्ज राहणारी खाकी वर्दी समाजासाठी भूषणावह असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

About Editor

Check Also

पद्म पुरस्कारांकरिता शिफारस करण्यासाठी समितीची स्थापना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *