आमदार रईस शेख यांची माहिती, भिवंडी शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळे दूर करणार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचेही आश्वासन

अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या भिवंडी- निजामपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका १० दिवसांमध्ये सर्व अडथळे दूर करेल, असे आश्वासन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले, अशी माहिती भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये शुक्रवारी, २९ मे रोजी  यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीस आमदार रईस शेख, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, भिवंडी -निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर, भिवंडीचे उपमहापौर तारीक मोमीन तसेच भिवंडी-निजामपूर पालिकेचे दिलीप पाटील, प्रसाद पटवर्धन, संदीप पटनवार आदी अधिकारी उपस्थित होते.

या संदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई  शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भिवंडी महापालिकेने मदत केली होती. भिवंडी पालिकेला पाईपलाईनसाठी जागा हवी आहे, ती मुंबई पालिकेची आहे. ही जागा भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे. ‘बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व महानगरपालिकांना मदत करेल. शेवटी, मुंबई महानगर क्षेत्र परिसराच्या विकासाचा प्रश्न आहे’, अशी भूमिका मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतल्याचे सांगितले.

आमदार रईस शेख म्हणाले की, या योजनेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर जमीन घेण्यासंदर्भातल्या अडचणीवर चर्चा करण्यात आली.  २५ ऑक्टोबर २०२४ रोजी जागेचा प्रस्ताव  सादर करण्यात आला आहे. संयुक्त बैठका, स्थळ पाहण्या, नकाशे, जागेचे सीमांकन व तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता भिवंडी पालिकेकडून करण्यात आली आहे. अंतिम प्रशासकीय मान्यता व जमीन हस्तांतरण प्रक्रिया बाकी आहे. त्या संदर्भातले सर्व अडथळे तातडीने दूर केले जातील, असे मुंबई पालिकेकडून आज बैठकीमध्ये सांगण्यात आले.

आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, सदर पाणीपुरवठा योजना रु. ४२६ कोटी खर्चाची असून सन २०५४ पर्यंत भिवंडीच्या होणाऱ्या १५ लाख ८४ हजार लोकसंख्येचा विचार करून या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पिसे धरण स्रोत, बीएमसी टॅपिंग स्रोत तसेच स्टेम पाइपलाईन स्रोताद्वारे भिवंडीला २७३ द. ल. लि. पाणी मिळणार आहे. योजनेमध्ये जॅकवेल, ओव्हरहेड पंप हाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, जलसंतुलन टाक्या, वीज केंद्रे, नदी व नाल्यावरील पूल, पंपगृहे तसेच सुमारे २४ कि.मी. लांबीची १३२१  मिमी व्यासाची १२ मिमी जाडीची पोलादी पाईपची मुख्य जलवाहिनी टाकण्याचा समावेश असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, भिवंडीकरांच्या पाणी टंचाईचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी सदर योजना महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका व संबंधित विभागांकडे पालिका प्रशासन सतत पाठपुरावा करत आहे. योजनेच्या ७५ टक्के मंजुऱ्या प्राप्त असून जमीन हस्तांतरणानंतर दोन वर्षांमध्ये योजना पूर्णत्वाला जाईल, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून जमीन देण्यास मंजुरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागांव-सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून चार एकर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *