धारावीच्या विकासाच्या नावाखाली महायुती सरकारने अदानीला मुंबईतील हजारो एकर जमीन दिली आहे. नाव धारावीचे आणि फायदा अदानीचा करुन दिला जात असून भाजपा सरकारने मुंबई अदानीला विकली आहे. धारावीकरांना देशोधडीला लावून सरकारला धारावीत दुसरी बीकेसी उभी करायची आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत झाले पाहिजे. धारावीसाठी काँग्रेसने नेहमी संघर्ष केला आहे व धारावीकरांच्या हक्कासाठी यापुढे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढा देऊ, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी धारावी एक्सपिरियन्स सेंटरवर सर्वपक्षीय धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, आम आदमी पक्षाच्या प्रिती शर्मा, माजी आमदार बाबुराव माने प्रकाश रेड्डी यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, धारावीला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते, या भागात सर्व प्रकारचे उद्योग आहेत पण हे उद्योग आज धोक्यात आले आहेत. या उद्योगांवर प्रचंड दबाव आणला जात आहे. धारावीत पाणी नाही, रस्ते नाहीत, शौचालय नाहीत. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (ANDPL) या कंपनीमध्ये अदानी समूहाचा ८०% आणि महाराष्ट्र शासनाचा फक्त २०% हिस्सा आहे. पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपती मित्रासाठी गरिबांवर अन्याय, अत्याचार केले जात आहे. सर्व प्रशासन अदानीच्या दिमतीला लावले आहे. धारावीकरांसाठी मोर्चा काढला तर गुन्हे दाखल केले जातात. आधी दलालांचा वापर झाला, आता दबाव आणला जात आहे, धमकावले जात आहे, हे सहन करणार नाही.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, धारावी विकासाबाबत कोणालाच काही माहिती दिली जात नाही. बीएमसीला माहिती नाही व लोकप्रतिनिधींनाही माहिती नाही. घराच्या बदल्यात घर, दुकानाच्या बदल्यात दुकान मिळाले पाहिजे. धारावीतला एकही व्यक्ती धारावीबाहेर जाणार नाही, मुलुंड, देवनार, मुकुंदनगर, कुर्ला या ठिकाणी पुनर्वसन करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. धारावीचा विकास धारावीकरांच्या मर्जीने होईल अदानीच्या मर्जीने नाही असा इशाराही दिला.
यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भाजपा महायुती सरकारवर सडकून टीका केली व धारावीच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करु, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Marathi e-Batmya