काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी मार्गदर्शन करणार ! सोमवार, २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान शिबिर; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे सोमवार, दि. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

नाशिक येथील एमटीडीसी रिसॉर्टमध्ये होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात आगामी काळातील काँग्रेसची दृष्टी व दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, काँग्रेसची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही या प्रशिक्षणात विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

राज्य आणि देशपातळीवरील विविध क्षेत्रांतील मान्यवर अभ्यासक व तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय वॉर रूमचे प्रमुख खासदार शशिकांत सेंथिल तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील AICC प्रशिक्षण टीम या संपूर्ण प्रशिक्षणाची धुरा सांभाळणार आहे.

‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या व्यापक दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासोबतच जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, संघटनात्मक कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वक्षमता या चारही बाबी विकसित करण्यावर प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे.

प्रशिक्षणाचा भाग म्हणून प्रशिक्षणार्थी दररोज श्रमदानात सहभागी होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील वास्तव आणि जनतेच्या प्रश्नांची प्रत्यक्ष जाणीव व्हावी यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभवही त्यांना देण्यात येणार आहे. श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेत संघटनात्मक व राजकीय नेतृत्व अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणातून केला जाणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *