जनावरांच्या लसप्रश्नी विरोधकांचा सभात्याग पदुम मंत्री महादेव जानकर असमाधानकारक उत्तर दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील २कोटी १० लाख शेतीपयोगी जनावरांना लाळ-खुरकूत रोग होवू नये यासाठी लस देण्यासाठी राज्य सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याप्रश्नी पशु व दुग्ध संवर्धन मंत्री महादेव जानकर हे प्रश्नांशी संबधित नसलेली उत्तर देत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी करत सभात्याग केला.

विधानसभेत मागील आठवड्यात याविषयावर लक्षवेधी सूचना पुकारण्यात आली होती. त्यावेळी पदुम राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी असमाधानकारक उत्तरे दिले. त्यामुळे ही लक्षवेधी सूचना राखून ठेवण्यात आली होती. त्यानुसार ही लक्षवेधी सूचना आज पुन्हा पुकारण्यात आली. त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी ही लक्षवेधी सूचना पुन्हा उपस्थित केली. त्यावर अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुनिल प्रभू यांनी उपप्रश्न विचारले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, जनावरांना द्यावयाच्या लसीच्या संदर्भात दिरंगाई का करण्यात येतेय याबाबत पदुमचे निवृत्त प्रधान सचिवांशी मी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अतिरिक्त सचिव डी.एन.चव्हाण, सचिव मुरकुटे यांच्याकडून मंत्र्यांना चुकीची माहिती देण्यात येत आहे. तसेच लस टोचण्याची निविदा एका विशिष्ट कंपनीला देण्याकरीता या गोष्टी करण्यात येत असल्याचा आरोपही केला.

त्यास उत्तर देताना पदुम मंत्री जानकर म्हणाले की, असे काहीही नाही. इंडियन इमॉलॉजिकल कंपनीने राज्य सरकारने निर्धारीत केलेल्या निविदा अटीतील शर्तींचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेली निविदा रद्द करण्यात आली. तसेच निविदेत निर्धारीत केलेली रक्कमपेक्षा जास्त रकमेची निविदा भरण्यात आली.

या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडियन इमॉलॉजिकल ही कंपनी केंद्र सरकारची अंकित कंपनी आहे. या कंपनीला हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड राज्यात लसी करणाचे काम मिळाले असताना त्यांना काम न देण्याचे काय कारण? असा सवाल केला.

त्यावर केंद्र सरकारची अंकित कंपनी आहे म्हणून त्यांनाच काम दिले पाहिजे असा नियम नसल्याचे पदुम मंत्री जानकर यांनी सांगत त्यांनी अटी व शर्तींचा भंग केल्याने त्यांना काम दिले नसल्याचा मुद्दा पुन्हा निदर्शनास आणून दिला.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या सदस्यांनी प्रश्न विचारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी तालिका सभापती योगेश सागर यांना केली. मात्र राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्यानंतर पदुम मंत्री जानकर यांनीही सविस्तर उत्तरे दिल्याचे सांगत आणखी प्रश्न विचारण्यास परवानगी नाकारली. त्यावर विरोधकांनी मंत्री असंबध उत्तरे देत असल्याचे सांगितले. मात्र सागर यांनी अधिकचे प्रश्न विचारण्यास नकार देत पुढील कामकाज पुकारले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

 

About Editor

Check Also

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती गठीत प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अभ्यासपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *