फक्त पाच वर्षे अफूची शेती करायची परवानगी द्या शिवसेनेच्या सुभाष साबणे यांची विधानसभेत मागणी

नागपूर : प्रतिनिधी

मराठवाडा आणि विदर्भातील शेतीच्या मालाला हमीभाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. जर हमीभाव देत नसाल तर किमान आमच्या भागातील शेतकऱ्यांना पाच वर्षे अफूची शेती करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून शेतकरी या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडू शकेल. त्यामुळे अफूची शेती करण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत २९३ अन्वये खाली राज्यातील शेतीशी निगडीत प्रश्नांवर, तसेच उद्योग, वीज यासह महत्वाच्या प्रश्नांवर सुरु असलेल्या चर्चेच्यावेळी साबणे यांनी वरील मागणी केली.

राज्यातील शेतकऱ्यांना तुमची कर्जमाफीची भीक नकोय. तसेच त्याला तुमच्या अनुदानाची गरज नाही. फक्त शेतकऱ्यांने पिकविलेल्या मालाला चांगला हमी भाव मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला चांगला हमीभाव मिळाला तर त्याला कर्ज काढण्याची वेळ येणार नाही की त्याची परिस्थिती वाईट होणार नसल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतीमालावर आधारीत असलेल्या उद्योगांची मोठ्या प्रमाणावर गरज असून हे उद्योग जर निर्माण झाले तर शेतकऱ्यांवर बाजारातील भाव कोसळले म्हणून त्याचे नुकसान होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मुबलक वीज, पाणी आणि शेती मालावर प्रक्रिया करणाऱे उद्योग निर्माण केले तर शेतकऱ्यांना सातत्याने चांगले उत्पन्न मिळत राहील. तसेच नाशवंत मालाचे दरही निश्चित करण्याची आवश्यकता असून जास्तीत जास्त कोल्ड स्टोअरेजची निर्मिती करण्याची गरज असल्याचे सांगत या गोष्टी केल्या तर शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत द्राक्ष पिकाचा समावेश द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी द्राक्ष शेतीचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये समावेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *