४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार ४ हजार ७५० रोजगारांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निर्मिती

मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या प्रमुख  उपस्थितीत शुक्रवारी ‘वर्षा’ निवासस्थानी महाराष्ट्र शासन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जबिल तसेच दुबईस्थित आरएसए ग्लोबल यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे महाराष्ट्रात ४ हजार ८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ४ हजार ७५० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.

या दोन्ही प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक, निर्यात क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला वेग मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रस्थान आणखी मजबूत होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

पुण्यात जबिलचा १ हजार ५००  कोटींचा विस्तार प्रकल्प

जबिल कंपनी पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (ईएमएस) विस्तार प्रकल्प उभारणार आहे. फाईव्ह जी उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित नेटवर्किंग स्विचगिअर्सच्या उत्पादनासाठी कंपनी १ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून सुमारे ४ हजार थेट रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रात गेली २३ वर्षे कार्यरत असलेल्या जबिलचे राज्यात १० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीची नवी अत्याधुनिक उत्पादन सुविधा १७ जून २०२६ रोजी सुरू होणार आहे.

रायगडमध्ये अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क

महाराष्ट्र शासन आणि आरएसए लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन प्रा. लि. यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामंजस्य करारानुसार रायगड जिल्ह्यातील उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) परिसरात २५ हेक्टर क्षेत्रावर अत्याधुनिक ‘अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी २ हजार ५८० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे ७५०  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. कंटेनर स्टॅकिंग, कंटेनर धुलाई व स्वच्छता, दुरुस्ती, रिकाम्या कंटेनर्सची हाताळणी आणि साठवण यांसारख्या अत्याधुनिक सुविधा येथे विकसित करण्यात येणार आहेत.

About Editor

Check Also

विप्रोच्या एआयमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली नोकर भरती आणि सॉफ्टवेअर विकास आणि कराराचे स्वरूप बदलतोय

विप्रोच्या एआय (AI) उपक्रमांमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली आहे, ज्यांना नंतर भारतीय आयटी फर्ममध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *