मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा आढावा बीडीडी चाळीच्या सदनिकांचे हस्तांतरणाचे नियोजन

विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.

बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणारे विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करणे, म्हाडास उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाच्या सदनिका या संक्रमण शिबिरासाठी वापरणे अथवा सोडतीद्वारे विक्री करणे, विनिमय 33(4) अंतर्गत रहिवाश्यांना अतिरिक्त क्षेत्राचा लाभ देणे व या क्षेत्रावर प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्राचा लाभ देणे यासह विनिमय ३३(५), ३३(७), ३३(९) व ३३ (२४) अंतर्गत सुचविण्यात आलेल्या सुधारणांवर तसेच म्हाडा वसाहतीतील विकास आराखड्यातील आरक्षण, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

बीडीडी चाळींच्या सदनिका हस्तांतरणाचे नियोजन

म्हाडाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ प्रकल्पांवरही यावेळी चर्चा झाली. वरळी बीडीडी चाळीतील ९८६९ पुनर्वसन सदनिकांपैकी ३८८८ सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून पुढील दोन आठवड्यात ५५६ सदनिकांचे हस्तांतरण होणार आहे. तसेच १४१९ सदनिकांचे सप्टेंबर २०२५ मध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे. तर १६४२ सदनिकांचे हस्तांतरण ऑगस्ट २०२७ पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नायगाव बीडीडी चाळीतील ३३४४ सदनिकांपैकी १९३८ सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर २०२५ मध्ये ८६४ सदनिकांचे हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या प्रकल्पातील २५६० पुनर्वसन सदनिकांपैकी १२४१ सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी ३४२ सदनिकांचे हस्तांतरण डिसेंबर २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पत्राचाळ प्रकल्पातील मूळ ६७२ सभासदांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या प्रकल्पातील ३ भूखंडावरील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आले असून ४ भूखंडावरील एकूण १२४३ सदनिका बांधकामासाठी कार्यादेश जारी करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय सुरभी गृहनिर्माण संस्था, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, आराम नगर अभिन्यासाचा पुनर्विकास, मोतीलाल नगर, अभ्युदय नगर प्रकल्प, वांद्रे रिक्लेमेशन व आदर्शनगर वरळी वसाहत, जीटीबी नगर सायन कोळीवाडा वसाहत पीएमजीपी वसाहत, पूनम नगर प्रकल्प तसेच मुंबई महानगर ग्रोथ हब आदी प्रकल्पांच्या पुनर्विकास प्रकल्पांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यासाठी म्हाडाने योग्य सुधारणा करण्याचे निर्देश नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. म्हाडा मुंबईचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर, मिलिंद शंभरकर यांच्यासह विविध मंडळाचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मेट्रो- ४ च्या स्लॅब दुर्घटनेप्रकरणी कारवाई कधी करणार अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रावर अद्याप कारवाई नाही

मेट्रो ४ चा मुलुंड भागातील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *