राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी
देशात आणि राज्यात सेना- भाजपची सत्ता येणार नाही त्यामुळे ‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखं असेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सेना-भाजपला लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘तुमचा पीएम आमचा सीएम’ असं वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला.
कालपर्यंत संजय राऊत आमचा सीएम आणि पीएम तुमचा असे सांगत होते. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आमचाच होईल असे सांगत होते. परंतु ना नवमन तेल होगा ना राधा नाचेगी अशी जोरदार टिकाही त्यांनी केली.
देशात आणि राज्यात लोकं सत्ता परिवर्तन करु इच्छित आहेत. लोकसभा, विधानसभा असो सेना- भाजपचा पराभव निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करतानाच स्वप्न पाहायला कोण कुणाला थांबवू शकत नाही अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
देशात आणि राज्यात सरकारविरोधी लाट आहे हे दोन्ही पक्षांना माहित आहे. एकसंघ आलो नाही तर भुईसपाट होणार हे त्यांना माहीत आहे म्हणून ते एकत्र आले आता त्यांची मुख्यमंत्री पदावरुन भांडणे सुरु आहेत परंतु त्यांना भांडणे करण्याची संधीच मिळणार नाही. सत्ता परिवर्तन हे निश्चित आहे असा जबरदस्त आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Marathi e-Batmya