मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हातावर लिहिलेली चिठ्ठी त्या डॉक्टर महिलेचीच महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या स्वतंत्र चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अमित साटम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर महिलेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ज्या-ज्या संबंधितांची नावे समोर आली, त्यांची चौकशी करण्यात आली आहे. संबंधित महिलेने आपल्या हातावर लिहिलेले सुसाईड नोटचे अक्षर हे त्या महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी संबंधित महिला डॉक्टरचे शारीरिक शोषण आणि फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हेगारांना अनफिट प्रमाणपत्र दिल्याचे हे प्रकरण होते. हे प्रकरण पाच महिन्यापूर्वीचे असून आत्महत्येविषयी आरोपींनी केलेली फसवणूक हे महत्वाचे कारण समोर आले आहे. तसेच आत्महत्येपूर्वी महिलेला भेटण्यास कोण कोण आले याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी दिली.

यावेळी काही सदस्यांनी राज्य सरकारने महिला अत्याचार रोखण्यासाठी केलेल्या शक्ती कायद्याची आठवण करून दिली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याने केलेला कायदा हा केंद्राच्या कायद्यावर अधिक्षेप ठरल्याने केंद्राने राज्याचा शक्ती कायदा मंजूर केला नसल्याचे सांगितले. तसेच आपण ज्या राज्याच्या धर्तीवर शक्ती कायदा केला, त्या राज्याच्या कायद्यालाही मंजुरी मिळाली नसल्याचेही स्पष्ट केले.

गुटखा तस्करांवर मकोकाखाली कारवाई

तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुटखा विक्रीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विक्रीसाठी गुटखा पुरविणाऱ्या गुटखा तस्करांवर यापुढे मकोका कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार आहे. तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी मुंबई महानगर प्रदेशात पुनर्वसन केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असेही सांगितले.

तसेच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. कायद्यातील तरतुदींनुसार गुटखा तस्करीला तो लागू होत नव्हता. त्यामुळे आरोपींना जामीन मिळत होता. त्यामुळे आता या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल. अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, असेही सांगितले.

राज्यात गुटखा बंदी आहे.गुटखा विक्री आणि वहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शाळा किंवा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात गुटखा विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

ओबीसी वसतिगृहाच्या प्रश्नात लक्ष घालणार

इतर मागासवर्ग समाजातील ( ओबीसी ) विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या चार जिह्यात जागा उपलब्ध व्हावी म्हणून आपण स्वतः लक्ष घालणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यासाठी ६५ वसतिगृहे तयार केल्याबद्दल अतुल सावे यांचे कौतुक केले.

या वसतीगृहासंदर्भात आपण दहा-बारा वर्षे चर्चा करत होतो, परंतु प्रश्न काही पुढे जात नव्हता. अतुल सावे यांना हा विभाग मिळाल्यानंतर मी त्यांना विनंती केली की प्रत्येक वसतिगृहासाठी जागा शोधा. आज त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्याचा आनंद असून एकूण ६५ वसतीगृह सुरू झाली आहेत. भाड्याच्या इमारतीत वसतीगृहे न चालवता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जागा असावी, या उद्दिष्टाने जागा शोधण्याचे काम सुरू असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जागा निश्चित झाल्या आहेत,असे फडणवीस यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ७५ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या पुरवणी मागण्या

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एक नवी प्रथा निर्माण करण्यात आली असून या प्रथेनुसार विधिमंडळाचे कोणतेही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *