नाना पटोले यांची टीका, ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा देणाऱ्या भाजपाला अद्दल घडवा अकोट मतदारसंघातील काँग्रेस मविआचे उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जाहीर सभा

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांना मते मागण्याचा भाजपाला काही एक अधिकार नाही. काँग्रेस मविआची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस व मविआचे उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, डॉ. अभय पाटील, हिदायत पटेल, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश लोणकर, हरिभाऊ भदे, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमनकर आणि मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपाचे सरकार आले तर नदीजोड प्रकल्प करण्याची देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती पण २०१४ ते १९ भाजपाचे सरकार होते, त्यानंतर अडीच वर्षांचे सरकार होते पण फडणविसांनी ते काम केले नाही. काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांची ही संकल्पना असून मविआची सत्ता आल्यानंतर हा नदीजोड प्रकल्प पुर्ण करु. २०१९ साली काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून मविआची सत्ता स्थापन केली आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली. आता काँग्रेस मविआचे सरकार आले की जुनी पेन्शन लागू करू, २५ लाखांचा आरोग्य विमा, महिलांना ३ हजार रुपये, शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी व शेतमालाला भाव देऊ असे आश्वासन दिले.

शेवटी नाना पटोले म्हणाले की, निवडणुका आल्या की भाजपा हिंदू-मुस्लीम करून मते मागतो. जातीधर्मात फूट पाडून सत्ता मिळवण्याचा भाजपाचा हा डाव आहे परंतु देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसच्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले आणि आजचे पंतप्रधान एक हैं तो सेफ हैं, म्हणत मते मागत आहेत. १० वर्षात नरेंद्र मोदी देशाला सेफ करू शकले नाहीत, मोदी हे देशातील आजपर्यंतचे सर्वात कमजोर पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रातील ६७ हजार महिला बेपत्ता आहेत, बदलापुरच्या शाळेत लहान मुलींवर अत्याचार केले, महिला मुली सुरक्षित नाहीत. भाजपाला सत्तेचा माज आला असून वणीमध्ये भाजपा नेत्यांने ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा दिली. ओबीसी समाजाला कुत्रा म्हणणाऱ्या भाजपाला आता मतदानातून अद्दल घडवा, असे आवाहनही केले.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *