शरद पवार यांचा आरोप, मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजनाबध्द प्रयत्न कानडीचा द्वेष आम्ही करणार नाही

सीमाप्रश्न हा फार जुना प्रश्न आहेत. यात महाराष्ट्राची जी मागणी आहे तिला जनतेचा आधार आहे. आपण अनेक निवडणुकीमध्ये हा निर्णय लोकांचा आहे हे देशासमोर सिद्ध करू शकलो. अनेकदा याठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तरीही काही होत नाही हे पाहिल्यानंतर लोक नाउमेद होतात. अशी परिस्थिती सध्या सीमा भागात झाली आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी बेळगाव किंवा अन्य भागातील प्रश्न संपुष्टात कसा निघेल, इथले मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजनाबद्ध प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सीमावाद प्रश्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केला.

शरद पवार म्हणाले, अनेक सरकारी कार्यालये या ठिकाणी आणली, कानडी लोकसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. मराठी आणि कानडी याच्यात वाद नाही. कानडीचा द्वेष आम्ही कधी करणार नाही. कानडीसुद्धा एका राज्याची भाषा आहे. आपल्या त्या राज्याशी संघर्ष नाही आपला संघर्ष फक्त तिथे असलेल्या मराठी भाषिकांना न्याय मिळावा, त्यांना न्याय मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे जो लोकशाहीच्या माध्यमातून अनेकदा सिद्ध झाला. तेवढ्यापूरता हा प्रश्न आहे पण दुर्दैवाने तिथल्या सरकारने वेगळी भूमिका घेतली. आज राज्याचे अधिवेशन त्या भागात घेता येईल यासाठी विधीमंडळ तिथे बांधले, येणारे अधिवेशन हे बंगळूरला न होता बेळगावला होणार आहे, यातून त्या भागाचा महाराष्ट्राशी अथवा मराठी भाषिकांशी काही संबंध नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. शाळेत शिकण्याऱ्या विद्यार्थ्यांना मराठी न शिकता कानडी शिकावे हा आग्रह आहे त्यामुळे लोक अस्वस्थ असल्याचे सांगितले.

आज मुंबई शहराचा विचार केला तर याठिकाणी अनेक गुजराती, बंगाली, उर्दू, तसेच इतर भाषिक शाळा आहेत. कधीही याठिकाणी मराठी सक्ती आहे असे म्हटले नाही. मातृभाषा हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे तो महाराष्ट्राने व देशाने मान्य केला. तेच सूत्र कर्नाटकने मान्य करावे तर तेही होत नाही. यातून संघर्ष झाला तर त्यामध्ये सत्तेचा गैरवापर करून त्या चळवळीला किंवा विचाराला मोडून काढण्याचे काम कोणी केले तर त्याची प्रतिक्रिया निश्चित उठते. दुर्दैवाने यात केंद्र सरकारने लक्ष दिलेले नाही. काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमाप्रश्न उपस्थित केला. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी हे दोन राज्यांचे भांडण आहे. त्यावर इथे बोलण्याचा संबंध नाही. दोन राज्याच्या प्रश्नावर संसदेत नाही बोलायचं तर कुठे बोलायचं. जर यात तुम्ही लक्ष घालणार नसाल तर कोणी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी कोणाची. म्हणून केंद्र सरकारला बघ्याची भुमिका घेता येणार नाही असे स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारला सुनावले.

हा प्रश्न सीमेपुरता मर्यादित होता पण अलीकडे कोण म्हणतं आम्हाला गुजरातला जायचंय, कोण सोलापूरमधून आणखी कुठे जायचं म्हणतो. असे चित्र यापूर्वी कधी नव्हते. मी सोलापूरचा अनेकवर्ष पालकमंत्री होतो. या जिल्ह्यात कानडी, तेलगू, उर्दू, मराठी असे अनेक भाषिक लोक आहेत. इतके वर्ष हे सर्व लोक गुण्यागोविंदाने तिथे राहत आले आहेत. मात्र आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर, अक्कलकोट अशा ठिकाणी आपला हक्क सांगतात याचा अर्थ काय? असा सवालही त्यांनी केला.

कर्नाटकात मागील दोन दिवसापूर्वी निर्माण झालेली परिस्थिती आता थंड झाली आहे. या चळवळीत उतरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुक यंत्रणेवर हल्ले झाले. हे हल्ले थांबविण्यासाठी त्या सरकारची जबाबदारी असताना ती जबाबदारी त्यांनी नीट पाळली नाही त्यासाठी काही सांगण्याचा आवश्यता होती म्हणूनच ती भूमिका घेतली असे सांगतानाच  मला आनंद आहे की, आज सकाळी सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकाऱ्यांशी बोललो तेव्हा कळालं की त्याठिकाणी तणावाचे वातावरण नाही. त्यामुळे हे सर्व दुरुस्त होत असेल तर महाराष्ट्र कधीही कटुता वाढेल असे काम करणार नाही असेही त्यांनी सांगितले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की, कुठेही कटुता होणार नाही, सत्तेचा गैरवापर होणार नाही, वाहनांवर हल्ला होणार नाही  ही चांगली गोष्ट आहे. परंतू शेवटी ते म्हणाले की, आमची मागणी आम्ही सोडणार नाही. यात पुन्हा ते सोलापूर, अक्कलकोट या गोष्टी आल्याच. जर संयमाने जाण्याची भूमिका व अन्य भाषिकांच्या हिताची जपणूक करण्याची निती ही त्यांची कायम असेल तर आपल्याकडून आगळीक कधी होऊ दिली जाणार नाही ही काळजी महाराष्ट्रातून आपण घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

१७ डिसेंबरला ठरलेला मोर्च्याचा कार्यक्रम सर्वपक्षीय आहे. तो सर्वपक्षीय मोर्चा प्रभावीपणे करणे व महाराष्ट्रच नव्हे तर देशाचा स्वाभिमान जो शिवछत्रपतींची प्रतिष्ठा यासाठी अवघा महाराष्ट्र एकत्र येतो याचे दर्शन या मोर्च्याच्या माध्यमातून दिसेल व पुन्हा एकदा चुकीच्या गोष्टी, चुकीचा वापर राष्ट्रीय नेत्यांना एकप्रकारच्या बदनामीला मदत करणारी भूमिका या राज्यात घेतली जाणार नाही अशी अपेक्षा या मोर्चातून करू असेही ते म्हणाले.
राज्यपाल महोदय जे काही करतात यात अपेक्षा अशी आहे की केंद्रसरकारने काही निकाल घ्यावा. यात आपण समंजसपणे जावू. पण काहीही झालं तरी युगपुरूषाचा अपमान महाराष्ट्रातील कोणताही माणूस, कोणताही भाषिक असला तरी कदापि मान्य करणार नाही. संबंध महाराष्ट्र एकसंघ राहील याचे दर्शन उद्याच्या मोर्च्याच्या माध्यमातून आपण सगळे दाखवू असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळण्याचा असो अशा अनेक प्रश्नांची मालिका राज्यात असताना राज्यकर्ते त्याच्याकडे ढुंकून बघत नाही. त्यासाठी पक्षाच्यावतीने आंदोलन करावे, काही भूमिका ठरवावी यासाठी आपण बैठक घेणार होतो. पण दरम्यानच्या कालावधीत विरोधी पक्षनेत्यांच्या निवासस्थानी सर्व विरोधीपक्ष नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये वेगळा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तो कार्यक्रमही तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्याच्यामध्ये शिवछत्रपतींची प्रतिष्ठा, त्यासंबंधी राज्यपालांनी घेतलेली चमत्कारिक भूमिका आणि अन्य काही मागण्या याच्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे, एकत्रित शक्ती दाखवावी म्हणून कार्यक्रम बदलायला लागला. शेवटी ही सामूहिक शक्ती दाखवण्याशिवाय गत्यंतर नाही. या निष्कर्षाची सगळ्या पक्षाचे नेते आले म्हणून आपण हा कार्यक्रम बदलला असेही शरद पवार यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *