आशिष शेलार यांची घोषणा, पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. शेलार बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने, राजेश पांडे, श्रीपाद अष्टेकर, कलाकार अथर्व सुधामे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवातील सहभागिता, सामाजिक व राष्ट्रप्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांची गर्दी, देखावे आणि परंपरा यामुळे या उत्सवाची व्याप्ती मोठी आहे. जगात अशा व्यापक स्वरूपाचा उत्सव अन्यत्र आढळणे कठीण आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विधानसभेच्या पटलावर ऐतिहासिक निर्णय घेऊन गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला, असे अॅड. शेलार यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या घरगुती व सार्वजनिक परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, कथा आणि आठवणी bappa.org या व्यासपीठावर नागरिकांनी शेअर कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या माध्यमातून गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जगभर पोहोचविण्यासोबतच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा मान्यतेसाठी आवश्यक असलेले सांस्कृतिक दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. शेलार यांचे पुणेकर, गणेशभक्त व गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात राज्य शासनाच्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी अॅड. शेलार यांचे अभिनंदन केले.

bappa.org वेब ॲपच्या माध्यमातून गणेशोत्सवातील संस्कृती, परंपरा आणि कला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाच्या कथा, आठवणी आणि कलाविष्कार या व्यासपीठावर नोंदवावेत, असे आवाहन श्रीपाद अष्टेकर यांनी केले. ‘फोक लोक’ कार्यक्रमांतील कलाकारांचे अॅड. शेलार यांनी अभिनंदन केले.

यावेळी नागरिक, गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांच्या मागणीला यश, एमएसईडीसीएलने जाहीर केली अभय योजना अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रईस शेख यांनी सादर केली होती लक्षवेधी

भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून ऊर्जा मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *