शरद पवार यांची मागणी, राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांचे पत्र

राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून त्यांच्या  शेतातील उभी पिके पावसाअभावी करपली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रात पुढे शरद पवार म्हणाले की, राज्यभरातील  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन  औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना तातडीने दुष्काळसदृश घोषित करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात. याशिवाय  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार तर  शेतमजूर कुटुंबाला  प्रत्येकी २५ हजार रुपयांची  विशेष मदत देण्याची मागणी केली.

निम्मा सप्टेंबर उलटला तरी राज्याच्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यावर दुष्काळी स्थितीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र  लिहून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.  आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी करून तात्काळ  पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून १ लाख रुपये करण्यात यावे. तसेच सन  २०२५-२६ मध्ये पीककर्ज घेऊन यंदा थकीत झालेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा, अशी सूचनाही सरकारला केली आहे.

शेवटी पत्रात शरद पवार म्हणाले की, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद ही सर्वच उभी पिके पावसाअभावी करपली असून, कीड-रोगांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून, त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा यासंदर्भात परिस्थिती अधिकच कठीण होण्याची भीती व्यक्त केली.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा विकासकामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरा-मोहरा बदलणार विविध विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *