सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु होणार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेता येणार

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), सोलापूर असे करण्यास देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या निर्णयामुळे सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने महत्वाचे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येकी साठ अशी असेल. एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन असे हे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६ – २७) पासून उपलब्ध असणार आहेत. यामुळे या परिसरात सुमारे १८० विद्यार्थ्यांना या नव्या शैक्षणिक वर्षापासून सोलापूरमध्येच अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार आहे.

या नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेकरिता टप्पाटप्प्याने नव्याने नियमित शिक्षकांची ३९ पदे, शिक्षकेतर ३८ (यापैकी २२ नियमित व १६ बाह्ययंत्रणेद्वारे) पदे अशी पदनिर्मिती करण्यात येणार आहे. संस्थेच्या नवीन शिक्षक व शिक्षक पदावरील तसेच बांधकाम, यंत्रसामुग्री – उपकरणांकरिता अशा आगामी चार वर्षांतील सुमारे १५७ कोटी ६६ लाख दोन हजार रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीचे हे तीन पदवी अभ्यासक्रम सुरु होणार असल्याने इमारत दुरूस्ती, डागडुजी तसेच अन्य आवश्यक खर्चाकरिता म्हणून ११ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *