प्रताप सरनाईक यांचे निर्देश, उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा एसटी महामंडळाला दिले निर्देश

“बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. त्याचबरोबर, प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे आहे.

प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, दैनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे, अशा तक्रारी असतात. यासाठी आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी.

पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल आहे. वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी आहे. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे सांगितले.

प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. वक्तशीरपणा हीच एसटीची ओळख ठरली पाहिजे, यादृष्टिने एसटी प्रशासनाने सज्ज होण्याचे निर्देशही यावेळी दिले.

शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी, हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचेही सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *