देशातील १३ हजार उद्योगपतींनी देश सोडलाय. आणि ज्या ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून त्यांचे कामकाज सुरु केलं होतं. ते कामकाज आता बंद केलंय. मग किती जणांचे रोजगार गेले असतील? हा डेटा कार्पोरेट मिनिस्ट्रीचा असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी परदेशातून व्हिडीओ करून सांगतात परदेशात जाऊन नका, सोनं खरेदी करू नका आणि दुसरीकडे सांगितले जातंय देशाचा जीडीपी वाढला असल्याचं सांगितलं जातं. हे कसं शक्य आहे असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मनसे प्रमुख राज ठाकरे हे बोलत होते.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मोदी किर्गीस्थानला गेले होते. तिथून त्यांनी परत एकदा भारतीयांना सांगितलं. कोणी विदेशात जाऊ नका मला ही गोष्टच फार आवडली. विदेशातून भारतीयांना सांगायचं की विदेशात जाऊ नका, असे सांगताच उपस्थितीत एकच हशा उसळला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, भारताचा विकास दर ७.८ टक्के झाला आहे. जो अमेरिका आणि चीन पेक्षाही जास्त असल्याचा दावा केला जातयं. अस असतानाच नरेंद्र मोदी सांगत आहेत की परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका, जीडीपी वाढलेला असताना परदेशी का जायचं नाही? सोनं खरेदी का करायचं नाही? असा सवालही यावेळी केला,
तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, घरात चणचण असते, काटकसर तेव्हाच सुरु होते. संपूर्ण देशाची परिस्थिती ढासळलेली आहे. आर्थिक दृष्ट्या पुढे अनेक गोष्टी होतील. नीटसाठी जेन झी रस्त्यावर उतरले आहेत. उद्या अख्खा देश रस्त्यावर येईल असेही ते म्हणाले.
आज ६ सप्टेंबर २०२६ रोजी ठाणे येथील श्री. गडकरी रंगायतन येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरं कोणी नाही बसू शकत.
आपण धर्माभिमानी असलं पाहिजे धर्मांध होता कामा नये. तुम्हाला धर्मांध केलं जात आहे,… pic.twitter.com/DkK3BVR7Iv
— Raj Thackeray (@RajThackeray) September 6, 2026
राज ठाकरे म्हणाले की, आपण चाललोय कुठे, आणि करतोय काय ? जातीच्या वादात तुम्हाला गुंतवूण ठेवायचं आहे. जेणेकरून तुम्ही त्यात गुंतवून राहिलात की बाकिचे प्रश्न विचारायला मोकळे नसता. देशात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण वाढलेलं आहे. पण कोणी आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाहीत. सर्व गोष्टी बंद करायच्या त्याला सोशल मिडीया हे उत्तर आलंय. जे आता यांना भारी पडलंय असे सांगत सरकारवर टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरं कोणी नाही बसू शकत. पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावला पाहिजे पण दुसऱ्या भिंतीवर. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत नाही असे राज ठाकरे यांनी सांगत अमित ठाकरे यांच्या कृतीचं समर्थन केलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आपण धर्माभिमानी असलं पाहिजे धर्मांध होता कामा नये. तुम्हाला धर्मांध केलं जात आहे, जेणेकरून इतर गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं. डीजेच्या विषयावर मुख्यमंत्री पुण्यात काय म्हणाले ते मला अजून पर्यंत कळलं नाही. नागपूरात डीजे बंदी करण्यात आली आहे मग, संपूर्ण महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? बेरोजगारी, महागाई, ढासळलेली शिक्षण व्यवस्था हे असे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावरून दुर्लक्ष व्हावं म्हणून तुम्हाला धर्माची गुंगी दिली जातेय असा आरोपही यावेळी सरकारवर केला.
एसआयआरवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, २०२४ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात जे नवीन मतदार टाकले होते त्यातले ९५ टक्के मतदार सध्या एसआयआरच्या माध्यमातून काढून टाकले. म्हणजे २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष खोट्या मतदारांवर निवडून आला असाच त्याचा अर्थ झाला ना? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
यावेळी राज ठाकरे यांनी हिंदू आणि मुस्लिमांना इशारा देत म्हणाले की, मला सर्वाधिक भिती आहे ती म्हणजे येत्या गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील. जेणेकरून तुम्ही त्याच्यात गुंतून राहिलं पाहिजे. माझं सुजाण हिंदू आणि सजाण मुस्लिम नागरिकांना आवाहन आहे की सतर्क राहा. डीजे, डॉल्बी वापरला जाऊ नये आपले सण-उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जावेत ही भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली असल्याचंही यावेळी सांगितलं.
Marathi e-Batmya