सचिन सावंत यांची टीका, भाजपा हा ‘ढ’ पक्ष; अभ्यास न करता बरळण्याचे काम मुंबईत मुस्लीम लोकसंख्या वाढल्याचा आरोप ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता

भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत नाही कारण त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून ते सातत्याने हिंदू मुस्लीम मुद्दा उकरून काढतात. मुंबईत मुस्लीमांची लोकसंख्या वाढली हा मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा आरोप अभ्यासात कच्च्या असणाऱ्या व्यक्तीचा आहे. भाजपा व अमित साटम यांना झोपेत व स्वप्नातही मुस्लीमच दिसतात. ते प्रभूरामाचा जप करत नाहीत तर मुसलमान नावाचा जप करतात, असा घणाघाती हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

भारतीय जनता पक्ष व अमित साटम यांचा समाचार घेत सचिन सावंत पुढे म्हणाले की, अमित साटम यांनी मुंबईत हिंदुंची लोकसंख्या कमी झाली व मुस्लीम लोकसंख्या वाढली याची काही आकडेवारी दिली आहे. देशात जनगणना झालेली नाही, तर त्यांनी हा जावई शोध कोठून लावला? बरं, व्होटर वाढले असे म्हणता तर निवडणूक आयोग आणि भाजप त्यावर स्वतःची पाठ थोपटून घेत होते. भाजपा कसलाही अभ्यास न करता, माहिती न घेता बोलणारा ‘ढ’ पक्ष आहे. व्होट जिहाद म्हणून ते मतदारांचा अपमान करत आहेत. देशात बांगलादेशी वाढले अशी बोंबाबोंब भाजप करते तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम नाही का? ते अकार्यक्षम, कुचकामी आहेत असे अमित साटम यांना म्हणायचे आहे का? तसे नसेल तर अमित शाह यांनी अमित साटम यांची हकालपट्टी करायला हवी, अशी मागणीही केली.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा दारूण पराभव केला हे भाजपाच्या जिव्हारी लागले आहे. वर्षा गायकवाड या एक बौद्धधर्मीय महिला संसदेत निवडून गेल्या ही मनुवादी भाजपाची खरी पोटदुखी आहे. वर्षानुवर्षे ज्या समाजाला आणि महिलांना नेतृत्व करण्याची संधी मनुवाद्यांनी नाकारली त्यांना संविधानाने नेतृत्व करण्याची संधी दिली हे मनुवाद्यांना खुपते असा आरोपही केला.

शेवटी सचिन सावंत म्हणाले की, भाजपाला धर्म, जात, भाषा, प्रांत यावरून वाद उभे करून जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे. काँग्रेस पक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेच्या मुलभूत प्रश्नावरच लक्ष केंद्रीत करणार आहे. म्हणूनच विकास हवा आहे विवाद नको या काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला मुंबईकरांचा पाठिंबा मिळत आहे. भाजपाच्या अपप्रचाराला व धार्मिक मुद्द्यांना जनता भीक घालणार नाही, अशी आशा व्यक्त केली.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *