पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात ! भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थिती राज्यात निर्माण झाल्याची टीका भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज येथे केली.

गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले की, गणेशोत्सवावर या ही वर्षी ठाकरे सरकारने जे निर्बंध लादले आहेत ते एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना वारंवार सरकारशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करीत असताना सरकारने कोणालाही विश्वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली आज जाहीर केली. कारखान्यांमध्ये मुर्ती तयार करण्याचे काम चार महिने अगोदरच सुरु होते तेव्हा पासून मुर्तीकार संघटना सरकारला विचारणा करीत होते पण त्याकडे दुर्लक्ष केले.

कुणाशीही चर्चा न करता सर्वसमावेशक भूमिका न घेता सरकारने आता नियमावली जाहीर केली आहे. घरगुती गणेशाची मुर्ती २ फुटाची असा निर्बंध का घालण्यात आला? मग कारखान्यात तयार झालेल्या मुर्तींचे आता काय करणार? या सगळ्यावर रोजगार म्हणून विसंबून असलेल्या कारागीर, कारखानदार यांना शासन काय मदत देणार आहे का? गतवर्षी पासून हा उद्योग अडचणीत आहे. त्यांना मदत तर दिली नाहीच पण आता ऐनवेळेस निर्बंध घालून त्यांची कोंडी ठाकरे सरकारने केली आहे. असा एकतर्फी निर्णय लोकशाहीत मान्य नाही. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा. जर बंधने घालण्यात येणार असतील तर मुर्तीकरांना मदतीचे पँकेज जाहीर करावे तेही शासनाचे कर्तव्य आहे अशी मागणीही त्यांनी केली.

कोरोनाचे नियम पाळणे सर्वांनाच मान्य आहे. त्यासाठी सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे, कोरोनाचा फैलाव रोखणे या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. त्या कोणी नाकारत नाहीत, पण घातलेले निर्बंध असे आहेत त्यातून उत्सवाची परंपरा कशी राखली जाणार? गणेशोत्सवाची शंभर वर्षांपासूनची परंपरा खंडित होता कामा नये यासाठी सरकार काळजी घेताना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *