पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५ हजार १०० कोटी रुपये असून त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील ५०:५० टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्रसरकार व राज्यशासन उचलणार आहेत. राज्य शासनाचा एकूण वाटा २ हजार ५५० कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्य शासनाच्या हिस्स्यातील या २ हजार ५५० कोटींपैकी पुणे महानगरपालिका (२० टक्के) ५१० कोटी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (२० टक्के ) : ५१० कोटी, पीएमआरडीए (३० टक्के) ७६५ कोटी असा स्थानिक संस्थांचा सहभाग राहणार असून उर्वरित रक्कम राज्य शासन देणार आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच, पुणे-मुंबई या दोन महानगरांतील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
पुणे मेट्रो टप्पा – २ मध्ये बालाजीनगर, बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानके ;राज्य शासनाची अतिरिक्त खर्चास मान्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर व बिबेवाडी येथे ही दोन मेट्रो स्थानके उभारली जाणार असून त्यासाठी येणाऱ्या ६८३.११ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार असून वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेचा २२७.४२ कोटी रुपये, ‘ईआयबी’चे द्वीपक्षीय कर्ज ३४१.१३ कोटी रुपये, तर राज्य करांसाठी राज्य शासनाचे दुय्यम कर्ज ४५.७५ कोटी रुपये व व्याज रक्कमा राज्य शासनाचे अतिरिक्त बिनव्याजी दुय्यम कर्ज ६८.८१ कोटी रुपये अशा मिळून एकूण ६८३.११ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुणे मेट्रो टप्पा-२ चा विस्तार अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.
Marathi e-Batmya