भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला प्रथमच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे.
हा विशेष कार्यक्रम “सारे जहाँ से अच्छा” या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे. अवकाशातून भारत कसा दिसतो, या प्रश्नावर राकेश शर्मा यांनी दिलेल्या ऐतिहासिक उत्तरावर आधारित ही संकल्पना आहे. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी “क्लायमेट विथ आर्ट/स्पोर्टस/सिनेमा/स्पेस या विशेष सत्रात हे दोन्ही अवकाशवीर विद्यार्थ्यांशी व उपस्थितांशी संवाद साधतील.
१७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिओ वर्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकचा हा महत्त्वपूर्ण भाग आहे. हवामान विषयावरील जागतिक संवादासाठी हा मंच उभारण्यात आला असून प्रोजेक्ट मुंबई ही संस्था या कार्यक्रमाचे आयोजक असून महाराष्ट्र शासन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महापालिका यांचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे.
हवामान उपायांसाठी व्यापक संवाद
मुंबई क्लायमेट वीकमध्ये तळागाळातील संस्था, सामाजिक क्षेत्रातील नेते, उद्योग क्षेत्रातील शाश्वतता तज्ज्ञ आणि धोरणकर्ते एकत्र येऊन भारत व ग्लोबल साऊथसाठी हवामान उपायांवर चर्चा करणार आहेत. कार्यक्रमात हिलरी क्लिंटन, सौम्या स्वामीनाथन, एस्थर फिनिदोरी यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्तींसह केंद्रीय मंत्री व विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
नागरिक सहभागावर भर
मुंबई क्लायमेट वीकचा गाभा म्हणजे हवामान कृती सर्वांसाठी खुली करणे. “वातावरण” या नागरिक व्यासपीठावर कविता, कथा, गीत आणि संवादाद्वारे लोकांना आपले अनुभव मांडण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमात नवकल्पना स्पर्धा, युवक हरित उपक्रम आणि उपाययोजनांचे प्रदर्शन आयोजित केले जाईल.
या उपक्रमाचे प्रमुख भागीदार आयडीएफसी फर्स्ट बँक असून, डेलॉईट हे धोरणात्मक ज्ञान भागीदार आहे. टाटा सामजिक विज्ञान संस्था आणि आयआयटी मुंबई हे शैक्षणिक भागीदार आहेत. युवक सहभागासाठी युनिसेफ व युवाह उपक्रमाची साथ लाभणार आहे.
नेतृत्व आणि जागतिक सहभाग
कार्यक्रमात केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योगक्षेत्रातील नोवेल टाटा, नादिर गोदरेज, रोहिणी निलकेणी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर पर्यावरण विषयावर आपली भूमिका मांडणार आहेत.
नवकल्पना, युवक नेतृत्व आणि लोकसहभाग
‘एनएसई’च्या सहकार्याने इनोव्हेशन चॅलेंज, युवकांसाठी हरित नवकल्पना स्पर्धा, तसेच शहरभर सार्वजनिक व्याख्याने, चित्रपट प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. हवामान कृती लोकाभिमुख करण्यासाठी ‘सस्टेनेबिलिटी मेळा’ आणि समुदाय उपक्रम राबवले जातील.
मुख्य हबमधील प्रदर्शन क्षेत्रात स्टार्टअप, उद्योग, विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्था हवामान उपाय सादर करतील. धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि नागरिकांना उपाय प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल.
Marathi e-Batmya