दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट साखर उद्योग, कांदा प्रश्न आणि रयत शिक्षण संस्था यासंदर्भातच चर्चा झाल्याची दिलीप वळसे पाटील यांची माहिती

साखर उद्योगासमोर असलेले प्रश्न, कांदा उत्पादक शेतकरी आणि रयत शिक्षण संस्था या तीनच विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना दिली.

आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

दिलीप वळसे-पाटील पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार व मी राज्यातील अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम करतो. शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष आहेत आणि मी उपाध्यक्ष आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या काही प्रश्नांसंदर्भात चर्चा करायची होती. त्यासाठी वेळ मागितली होती. आज सकाळी ९ वाजताची त्यांनी वेळ दिल्याचे सांगितले.

शरद पवार यांच्याबरोबर रयत शिक्षण संस्थेमध्ये सदस्य असल्याने काही प्रश्नावरही चर्चा करायची होती असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दिलीप वळसे-पाटील पुढे म्हणाले की, शरद पवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वर्षे काम करत आहेत. या क्षेत्राचे नेतृत्व ते करत आले आहेत. आज राज्यात कांद्याच्या भावासंदर्भात आणि येणारा साखर हंगाम आहे. त्या हंगामात शुगर इंडस्ट्रीसमोरचे काही प्रश्न यासंदर्भात चर्चा झाली. परवा दिल्लीत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, शिवराजसिंह चौहान, प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत शेतकऱ्यांच्यावतीने आणि साखर व्यावसायाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डेलीगेशन केले होते त्याबद्दल चर्चा केली. अमित शाह यांनी कांद्यासंदर्भात व शुगर इंडस्ट्री संदर्भात आम्ही दहा दिवसात निर्णय घेतो असे सांगितले होते. तो दहा तारखेपर्यंत निर्णय येईल आणि त्या संदर्भात वेगवान हालचाली केंद्रात सुरू आहे अशी माहितीही शरद पवार यांना दिल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, अनेक वर्षात शेतकरी, शेतमालाचे भाव, कांदा, ऊस यासंदर्भात शरद पवारांनी लक्ष घातले होते. त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यावेळी अजितदादांनी त्यामध्ये लक्ष घातले होते. तेच या क्षेत्राची लिडरशिप करायचे. आम्ही एकत्रपणे सहकार चळवळ, शेतकरी, आणि सामान्य माणूस यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेत होतो असेही सांगितले. अजून यामध्ये काही सुचवायचे आहे का अशी विचारणा केली. एवढेच बोलणे झाले याव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही असा खुलासाही केला.

About Editor

Check Also

दिव्यांग संस्थांना मोठा दिलासा; ५८ संस्थांना त्रुटी पूर्ततेची संधी ७४ उपक्रमांना १०० टक्के वेतन अनुदानासाठी अंतिम मुदत

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत विशेष शाळा आणि पुनर्वसन संस्थांना शासनाने मोठा दिलासा दिला असून विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *