१७ पैकी ६ ठिकाणी बंडखोरांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश १२ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत

राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांचे बंड शमवण्यात कुठे काही नेत्यांना यश आलं, तर कुठे ऐनवेळी उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत. या सर्व घडामोडींनंतर १७ पैकी ५ जागांवर निकाल आधीच स्पष्ट झाला असून उर्वरित १२ जागांवर आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे. या महायुतीच्या खात्यात ५ जागा पडल्या आहेत यावरून या निवडणूकीत महायुतीचे पारडे जड दिसत आहे.

निवडणुकीच्या रिंगणातून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने ५ जागांवर बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीचा वरचष्मा असल्याचे दिसते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी उमेदवारांचा यात समावेश आहे. प्रामुख्याने कोकण, पुणे आणि ठाणे या महत्त्वाच्या पट्ट्यात महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.

बिनविरोध विजयी झालेले उमेदवार

वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर :- अरुण लखाणी (भाजप)
पुणे :- विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ठाणे :- रवींद्र फाटक (शिंदे शिवसेना)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग :- अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
यवतमाळ :- दुष्यंत चतुर्वेदी ( शिंदे शिवसेना)

अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष) यांच्यात लढत होणार होती. मात्र संध्याकाळी उशीरा दत्तात्रय पानसरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात सर्वात जास्त चर्चा रंगली ती बाळ माने यांनी अर्ज माघारी घेतल्याची. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाळ माने चक्क भाजप नेते नितेश राणे यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले. या धक्कादायक प्रकारानंतर बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

पुण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले. दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र पेच कायम आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यासमोर भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी आपले आव्हान कायम ठेवल्याने येथे आता चुरशीची लढत होणार आहे. नाशिकचा हा मतदारसंघ महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

१२ जागांवर आता आमने-सामने लढत

बिनविरोध जागा वगळता आता उर्वरित १२ जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी महायुती आणि मविआचे दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अनेक ठिकाणी अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

प्रमुख मतदारसंघातील मुख्य लढती

सोलापूर: राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी शप),

नागपूर : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस),

सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी शप), नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस),

छत्रपती संभाजीनगर : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (शिवसेना (उबाठा)
या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाची कसोटी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालांचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

About Editor

Check Also

दिव्यांग संस्थांना मोठा दिलासा; ५८ संस्थांना त्रुटी पूर्ततेची संधी ७४ उपक्रमांना १०० टक्के वेतन अनुदानासाठी अंतिम मुदत

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत विशेष शाळा आणि पुनर्वसन संस्थांना शासनाने मोठा दिलासा दिला असून विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *