एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही वारकऱ्यांसाठी सुविधा वाढविणार; शक्तिपीठ महामार्ग, रामरक्षा आंदोलन आणि रमेश म्हात्रे प्रकरणावरही स्पष्ट केली भूमिका

आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, वारकरी सेवा आणि लोकभावनेचा समतोल साधणारी भूमिका मांडत पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली असून त्यासाठी बैठकीची वेळही मागितली आहे. “महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. कोणत्याही विकास प्रकल्पासाठी जोरजबरदस्ती केली जाणार नाही. संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही,” अशी स्पष्ट ग्वाही दिली.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंढरपूरमध्ये दरवर्षी वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून विद्यमान रस्ते व जागा अपुरी पडत आहेत. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, येथे पिढ्यान्पिढ्या राहणारे नागरिक, शेतकरी आणि व्यवसायिक यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, याची सरकार पूर्ण काळजी घेईल, असे स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आषाढी एकादशीच्या दिवशी कॉरिडॉरविरोधात आंदोलन करण्याची भूमिका काही जणांनी घेतली होती. मात्र, वारी आणि विठ्ठलाच्या पूजेचा पवित्र सोहळा लक्षात घेऊन आंदोलन करू नये, अशी विनंती आपण संबंधितांना केल्याचेही सांगितले.

वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आवश्यकतेनुसार आरोग्य शिबिरांची संख्या वाढविण्यात येईल. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना सूचना देण्यात आल्या असून वारकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

चंद्रभागा नदीतील पाण्याच्या उपलब्धतेबाबत विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कॉरिडॉरच्या नियोजनात पाणी व्यवस्थापनाचाही समावेश आहे. वारकऱ्यांना पाण्याची कोणतीही कमतरता भासू नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

वारकरी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला मोठा विरोध झाला होता. मात्र, त्याचे फायदे दिसू लागल्यानंतर विरोध कमी झाला. ज्या ठिकाणी स्थानिकांच्या अडचणी आहेत, तेथे अलाइनमेंटमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न सुरू असून विकासासोबत लोकांच्या भावना जपण्यावर सरकारचा भर असल्याचे  सांगितले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “हा केवळ दिखावा आहे. ज्यांनी पूर्वी रामभक्तांचाच अपमान केला, तेच आज रामरक्षा करत आहेत. ही रामाची नव्हे, तर स्वतःच्या पक्षाची रक्षा करण्याची धडपड आहे.”

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कथित मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अशा प्रकारच्या मारहाणीचे आम्ही कधीही समर्थन केलेले नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आता सर्वांनी न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करावा.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना केली आहे. बळीराजा सुखी राहो, समाधानात राहो, चांगला पाऊस पडो आणि महाराष्ट्र समृद्ध होवो. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचाच आहे.”

आषाढीच्या पवित्र वातावरणात विकासाला लोकसहभागाची जोड, वारकऱ्यांच्या सेवेसाठी कटिबद्धता आणि बळीराजाच्या हिताचे आश्वासन देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली.

यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची टीका,…शक्तीपीठ मात्र पंढरपूर पासून हा रस्ता २३ किलोमीटर दूर विकास म्हणजे नक्की काय? दोन मजलेवरून रस्ता जाणार, यावरून माल वाहतूक होणार. शेतकऱ्यांचा यात काय फायदा?

पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सद्बुद्धी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.‌ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *