हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, जातनिहाय जनगणना हाच आरक्षणावरचा रामबाण उपाय डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची माहिती, सर्वात प्रथम जातनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनीच मांडला

जातीव्यवस्थेने समाजातील जाती-जातीमध्ये वाद उभे केले आहेत. जातीव्यवस्थेच्या रचनेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा गैरवापर मनुवाद्यांनी केला आहे. जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा मोठा आहे, पण आता त्यात बदल झाला पाहिजे. यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोरकसपणे पुढे आणला आहे. प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती, त्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. यासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह राहुल गांधी यांनी धरला व शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला, असे प्रतिपादन प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी केले.

काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे आज ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व ‘मंडल विरुद्ध मनूवाद’ पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिस्ती, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, खासदार प्रतिभा धानोरकर, प्रवक्ते हनुमंत पवार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रात आरक्षणासाठी विविध समाजाची आंदोलने सुरु आहेत. आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा वाढवणे व जातनिहाय जनगणना करणे हाच रामबाण उपाय आहे पण भाजपा सरकार ते करत नाही. राज्यात आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडा, तोडा व राज्य करा ही ब्रिटिशांची निती वापरून मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावली आहेत. काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण फडणवीस सरकारने पुढे चालु ठेवले असते तर आज ही वेळ आली नसती, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाज भाजपाच्या पाठीशी उभा राहिला पण भाजपाने या समाजाला काहीही दिले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी पहिला आवाज उठवला. राहुल गांधी यांनी आवाज उठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली. मंडल आयोगाने ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस होती हे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक, नोकऱ्यांसाठी होते पण मंडल आयोगाच्या आंदोलनात शिरकाव करून मनुवाद्यांनी ओबीसी समाजात गैरसमज पसरवले. मनुवाद्याने जातीजातीमध्ये विष पेरण्याचे काम केले आहे. मनुवादाचा हा विचार गाडण्याचे काम समतेचा विचारच करु शकते, असे वडेट्टीवार म्हणाले.

यावेळी बोलताना प्रा. यशपाल भिंगे म्हणाले की, देशात ओबीसी समाजाला चेहरा देण्याचे काम बिहारचे माजी मुख्यमंत्री बी. पी. मंडल यांनी देऊन मोठे उपकार केले आहेत. ज्या कालखंडात ओबीसीला चेहराच नव्हता अशावेळी ओबीसींचा चेहरा स्पष्ट केला तो बी. पी. मंडल यांनी. त्यांनी कष्ट करून सर्व आकडेवारी गोळा केली व २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. आता ओबीसी समाज फक्त मतदान करणारा नाही तर नेतृत्व करणारा बनला पाहिजे आणि त्यासाठी ‘हर एक ओबीसी, बनेगा काँग्रेसी’, हा संकल्प केला आहे असे म्हणाले.

‘मंडल विरुद्ध मनुवाद’ हे पुस्तक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही कळावे यासाठी लिहिले असल्याचेही प्रा. भिंगे यांनी सांगितले.

About Editor

Check Also

The Thackeray brothers will march in Mumbai today in protest against the ECI.

Thackeray brothers : आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा, ठाकरे बंधू नेतृत्व करणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *