फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या हाती पैसा देण्यासाठी या गोष्टी करा कापूस, तूर, चणा खरेदी केंद्रे सर्वत्र सुरू करण्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली.
लॉकडाऊन हे कोरोनावर मात करण्याचे प्रभावी आणि एकमेव अस्त्र असले तरी हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणेही आवश्यक आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकर्‍यांच्या समस्या त्वरेने सोडविल्यास याला फार मोठा हातभार लागेल. खरीप हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आता मशागतीच्या कामांना सुद्धा प्रारंभ होत आहे. बी-बियाणे, खते इत्यादींसाठी शेतकर्‍यांच्या हाती पैसा असणे जरूरी आहे आणि पैसा यायचा असेल तर शेतमालाची खरेदी सुरू होणे आवश्यक आहे. कापूस, तूर, चणा इत्यादींची खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आली असल्याने शेतकर्‍यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चण्याची खरेदी तर सुरूच झाली नसल्याने पूर्णपणे शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. खरेदीची प्रक्रिया अशीच राहिल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे लगेचच खरेदीची यंत्रणा सक्षम करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
शेतमाल खरेदी झाला तरच त्यांच्या हाती पैसा येईल आणि त्यांना पुढच्या हंगामाच्या कामाला लागता येईल. त्यामुळे सर्वच ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाबीजच्या आकृतीबंधास मंजुरी महाबीजच्या एकूण ७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मान्यता

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *