अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण तलाव म्हणून याकडे पाहिले जायचे. अनेक वर्ष या तलावाने पिण्याचे पाणी नागपूर शहराला दिले. मध्यंतरी जलपर्णीने हा तलाव व्यापला होता. मात्र, महानगरपालिकेने जलपर्णी नामशेष करण्यासाठी प्रयत्न केले व ते अत्यंत यशस्वी झाले आहेत. एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून हा तलाव विकसित करण्यासाठी राज्य शासन महानगरपालिकेला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूरची ओळख असलेल्या ऐतिहासिक अंबाझरी तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्व जपण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने राबविलेल्या जलपर्णी निर्मूलन मोहिमेची मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी मनपाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी नौकेतून अंबाझरी तलावाची पाहणी केली.

यावेळी महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, विविध समित्यांची सभापती, नगरसेवक नगरसेविका यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मनपातर्फे विशेष मोहीम

गेल्या काही महिन्यांपासून अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जलपर्णीच्या निर्मूलनासाठी मनपातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जलपर्णीमुळे तलावाचा मोठा परिसर व्यापला गेला होता. त्यामुळे तलावाचे नैसर्गिक सौंदर्य बाधित होण्यासोबतच जलतरणपटू आणि नौकायनाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली. सर्वांच्या प्रयत्नातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

जलपर्णी काढण्यासाठी जेसीबी आणि वीड हार्वेस्टरचा वापर करण्यात आला. या मोहिमेमुळे तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली असून अंबाझरी तलावाचा परिसर अधिक स्वच्छ आणि खुला झाला आहे. तलावाच्या संवर्धनासाठी मनपाने केलेल्या या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतली आणि उपक्रमाचे कौतुक केले.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे निर्देश, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवा कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेश करणार

जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *