रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
कृषि विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषि विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ६२.७९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्यात चालु वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अंत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पिक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी ३ लाख १३ हजार ५८६ क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह (क्लस्टर) पद्धतीने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत आहे. सुधारीत तंत्रज्ञानावर आधारीत गहू १८३० हेक्टर, हरभरा २६८२१ हेक्टर, मका (संकरीत) २९३ हेक्टर, रब्बी ज्वारी २४६० हेक्टर, करडई १५१० हेक्टर, जवस १०५० हेक्टर, ऊस पिकामध्ये आंतरपीक हरभरा २५०० हेक्टर असे एकूण ३६ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रब्बी हंगामामध्ये नवीन विकसित केलेल्या सुधारीत-संकरीत वाणांचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको या बियाणे पुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरीत करण्यात येते. १० वर्षाच्या आतील वाणांच्या बियाण्यासाठी गहू २०००रुपये क्विंटल, हरभरा २५०० रुपये क्विंटल, मका (सं) ७५०० रुपये क्विंटल, रब्बी ज्वारी ३००० रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन या योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *