भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत या इमारतीच्या दुर्घटनेत १९ जनांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच  प्रभावीपणे बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या वतीने दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५  लाखाची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी दुर्घटनेतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आपत्तीच्या काळात प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सदर इमारतीच्या शेजारील इमारतीतील नागरिकांचे देखील स्थलांतर करण्यात आले असून त्यांची सर्वतोपरी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनास दिले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ, यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन, महापालिका प्रशासन, तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर, जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *