माधुरी मिसाळ यांचे आश्वासन, अग्निसुरक्षा परवानगीची चौकशीत दोषी आढळल्यास विकासकावर कारवाई जोगेश्वरीतील प्रकरणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

मुंबईतील जोगेश्वरी येथील मे.ज्ञानप्रकाश शुक्ला डेव्हलपर्स एलएलपी या बांधकाम प्रकल्पाला देण्यात आलेल्या अग्निसुरक्षा परवानगीबाबत उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर तपासणीचे आदेश देण्यात आले असून, दोषी आढळल्यास संबंधित विकासकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

सदस्य प्रकाश सुर्वे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील प्रभू, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, बांधकाम आराखडे ऑनलाईन सादर झाल्यानंतर काम सुरू करण्यासाठी काही प्रकरणांमध्ये अग्निशामक दलाकडून तात्पुरती परवानगी दिली जाते. नियमानुसार ३२ मीटरपर्यंतच्या इमारतींसाठी अशा प्रकारची प्राथमिक परवानगी देण्याचा अधिकार अग्निशामक विभागाला असतो. या प्रकल्पाला दिलेली परवानगी नियमानुसार आहे का याबाबत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्यास सांगितले असून, सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या इतर मुद्द्यांचीही स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले.

तसेच शेवटी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, चौकशीत कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित विकासकावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल एका महिन्याच्या आत मागविण्यात आला असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुंबईत एका महिलेने ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या पोलिसांची व्हॅन अडवली सुरुवातीला एकटीने पोलिसांचे वाहन अडविले

पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी असलेली एक महिला, ताब्यात घेतलेल्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा मागचा दरवाजा उघडणारा एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *