इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक जाहीर ८ मे पर्यंत सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ८ मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ८ मे २०२६ पर्यंत एकूण सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग- 1 भरून नोंदणी केली आहे.

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरीता विशेष पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शून्य फेरी मध्ये ८ ते २० मे या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सादर करणे, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे, हरकती/ दुरुस्ती मागण्या, सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे, विविध कोट्यासाठी यादी देऊन रिक्त जागा प्रत्यार्पित करणे तसेच पहिल्या फेरीकरीता जागा प्रदर्शित करणे ही प्रक्रिया होईल.

नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-२ भरण्याची प्रक्रिया २१ आणि २२ मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅप फेरी-१ ची अलॉटमेंट प्रक्रिया २३ ते २६मे दरम्यान पार पडणार असून, २६ मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार असून, एसएमएसद्वारेही संदेश पाठविण्यात येणार आहेत.

प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी २६ ते २८ मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून, ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून, 8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *