वांद्रे पश्चिम येथे रविवारी एका कार अपघातात ८ वर्षांच्या अंश गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या अपघाताची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन कार चालक महिलेवर कठोर शिक्षा होईल अशी कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसह न्याय मिळावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
खासदार वर्षा गायकवाड यांनी पीडित गुप्ता कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली व योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. याघटनेवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ही घटना अत्यंत गंभीर व मनाला चटका लावणारी आहे. एका गरीब कुटुंबातील अंश गुप्ता हा एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठिण प्रसंगी त्यांना आधार देण्याची व न्याय मिळवून देण्याची गरज आहे. या अपघातप्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंदवला असल्याचे समजते पण यातून कार चालकाची सुटका होणार नाही याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अपघातास जबाबदार व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. कायद्याच्या पळवाटांचा फायदा आरोपीला मिळता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घालून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावी असेही खासदार गायकवाड म्हणाल्या.
बेदरकारपणे वाहन चालवणे हे कोणाच्यातरी जीवावर बेतू शकते याचा अनेक चालकांना विसर पडतो. अशा बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना कायद्याची जरब बसवण्याची गरज आहे. राज्य सरकार, पोलीस यांनी यात लक्ष घालावे व योग्य ती कारवाई कारवी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Marathi e-Batmya