रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन, मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ, गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट

मुंबईतील विद्यमान रेल्वे व्यवस्था विश्वासार्ह असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिचे उन्नयन करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३० पर्यंत ३ हजार ५०० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर आयोजित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर रितू तावडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मुंबई रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी येथे पाच नवीन फलाट आणि दोन पिट लाइन, दादर येथे एक अतिरिक्त फलाट, तर वसई रोड परिसरात सहा फलाट, तीन पिट लाइन आणि पाच स्टेबलिंग लाइन उभारण्यात येत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन फलाट आणि दोन पिट लाइन विकसित करण्यात येणार आहेत. अनेक फलाटांचा विस्तार करून ते १५ डब्यांच्या गाड्यांसाठी सक्षम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा ३५० विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. गरज भासल्यास आणखी २० विशेष गाड्या चालविण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी करण्यास रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नमूद केले.

लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने २३८ वातानुकूलित लोकल रेकच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. या निर्मिती प्रक्रियेत मॉडर्न कोच फॅक्टरी आणि रेल कोच फॅक्टरी यांचा समन्वय राहणार आहे. नवीन वातानुकूलित लोकलची पहिली गाडी २०२७ मध्ये उपलब्ध होईल, तर २०३० पर्यंत सर्व २३८ रेकची निर्मिती आणि पुरवठा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गालगत रेल्वेमार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार समृद्धी महामार्गालगत पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गांचे आरेखन करण्यात येणार आहे. या नवीन रेल्वेमार्गांमुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक परिसरातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल. मालवाहतूक आणि प्रवासी सेवांची क्षमता वाढल्याने राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पांतर्गत सुमारे ४५५ किलोमीटरचे पिअर्स आणि ३६५ किलोमीटरचे व्हायाडक्ट पूर्ण झाले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे दरम्यानच्या भूमिगत मार्गामध्ये भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्याच्या कामासाठी विक्रोळी आणि घणसोली येथून टनेल बोअरिंग मशीनद्वारे काम सुरू आहे. मुंबई-पुणे बुलेट ट्रेन कॉरिडॉर हा महाराष्ट्राच्या भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्याचेही केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी देशभरात पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहनही केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केले.

सावंतवाडी एक्स्प्रेस कोकणातील लाखो कुटुंबांची मने जोडणारी सेवा ठरेल– पीयूष गोयल

कोकणाला निसर्गाची विपुल देणगी लाभली आहे. या नैसर्गिक संपदेचे समृद्धीत रूपांतर करण्यासाठी रेल्वे, महामार्ग, रस्ते आणि उत्तम दळणवळण सुविधा आवश्यक आहेत. सावंतवाडी एक्स्प्रेस ही केवळ दोन टर्मिनलना जोडणारी रेल्वे नसून, कोकणातील लाखो कुटुंबांची मने जोडणारी सेवा ठरेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.

या दैनंदिन रेल्वे सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. कोकणातील धार्मिक आणि प्रेरणास्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांनाही या सेवेचा लाभ होईल. भारतीय रेल्वे, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्या समन्वयातून ही दैनंदिन सेवा सुरू झाल्याने कोकणवासीयांसाठी हा आनंदाचा दिवस असल्याचे गोयल यांनी सांगितले.

उत्तम दळणवळण सुविधांमुळे कोकणात उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल. स्थानिक युवक-युवतींना रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज कमी होऊन त्यांना परिसरातच रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. मुंबईत शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या नागरिकांचा आपल्या कुटुंबांशी संपर्क अधिक दृढ राहण्यासही या सेवेमुळे मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील रेल्वे आणि पायाभूत सुविधा विकासाला मोठी गती मिळाली आहे. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या विकासदृष्टीला पुढे नेत देशभरात व्यापक स्तरावर विकासकामे करण्यात येत आहेत. मुंबईची हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. भारत आज जागतिक स्तरावर विश्वासार्ह भागीदार म्हणून ओळखला जात आहे. देशाची निर्यात वाढत असून, उत्तम पायाभूत सुविधा आणि सक्षम वाहतूक व्यवस्थेमुळे आर्थिक विकासाला आणखी बळ मिळेल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी एक्स्प्रेस कोकण पर्यटन विकासाचा पुढचा टप्पा ठरेल– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम होऊन कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. सक्षम संपर्क व्यवस्था ही विकासाची गुरुकिल्ली असून, या रेल्वे सेवेमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांसह कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना या रेल्वे सेवेचा मोठा लाभ होणार आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने कोकणवासी कोकणात जातात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सुरू झालेली सावंतवाडी एक्स्प्रेस ही कोकणवासीयांसाठी मोठी भेट आहे.

कोकणाला निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. जलद आणि सुलभ दळणवळण सुविधांमुळे कोकणातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी अधिक सहज उपलब्ध होतील. या रेल्वे सेवेमुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, वाहतूक सेवा आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन मिळेल. मुंबई आणि कोकणातील संपर्क वाढल्यामुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, आता कोकणचा विकास थांबणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करताना संबंधित नागरिकांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली.

सावंतवाडी एक्स्प्रेसविषयी

मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान ही नवीन दैनंदिन एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. उद्घाटनपर विशेष गाडी क्रमांक ०१००१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.

या गाडीमध्ये एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असणार आहे.

कोकण क्षेत्रातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवास उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ही नवीन दैनंदिन सेवा महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *