मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजे, असे नियोजन करण्यात यावे. विविध विकास प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई उपनगर, ठाणे व पुणे येथे सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रकल्पाचे कंत्राटदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन – 2 – बी ही डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गाने धावणार असून यात १९ स्टेशन्स असणार आहे. हा मेट्रो प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ही मेट्रो लाईन ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. याकरिता नगरविकास विभागाने श्याम नगर स्टेशन येथील जमिनीसंदर्भातील अडचणी १५ दिवसात सोडवाव्यात. शिवडी ते वरळी हा जोडमार्ग प्रकल्प दिवसरात्र कामे करून पूर्ण करण्यात यावा. जे प्रकल्प मागे पडले ते वेळेत कसे पूर्ण होतील, यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ चे कामकाज ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून २०२९ पर्यंत पूर्ण तर वरळी येथील प्रकल्प मे २०२९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. मुंबईतील एन.एम.जोशी बीडीडी चाळ प्रकल्प हा जून २०३१ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना करत ‘बीडीडी चाळ’ प्रकल्पास अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, उत्तन विरार सी लिंक प्रकल्प, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण होईल, असे पाहण्याचे निर्देश दिले. ऐरोली-कटई नाका फ्रीवे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटावर येणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तात्काळ रक्कम द्यावी असे निर्देशही दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामार्फत वडपे-ठाणे हा २३.८ कि.मी. रस्ता बांधकाम सुरू असून यातील १९ किमीचा रस्ता तयार झाला असून संपूर्ण रस्ता मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्याचबरोबर मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. वांद्रे -वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमार्फत मागाठाणे-गोरेगाव डी.पी.रोडचे सुरू असून यासाठी जमीन अधिग्रहणाबरोबरच प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात येणारे निवासस्थानाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. प्रकल्पाग्रस्तांकरिता बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात यावा. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे जुनी प्रकल्पबाधितांची घरे नवीन तंत्रज्ञानाने तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. फिल्म सिटी गोरेगाव ते खिंडीपाडा मुलुंड येथे दुहेरी बोगद्यांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांनी जास्त मनुष्यबळ नियुक्त करावे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील नागरिक नवी मुंबई विमानतळाकडे सहज पोहचू शकणार आहेत. वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून खार जमिनीची परवानगी मिळाली असून हा प्रकल्प ३० डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होण्यासाठी वेगवेगळे टप्पे करण्याचे आदेशही यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासोबतच महावितरण,जलसंपदा आणि सिडको यांच्यामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *