मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकूण २,४३० दिवस या पदाची सूत्रे हाताळल्याने सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेतृत्वाच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. शरद पवार यांना पाठी टाकत ते या क्रमांकावर पोहोचले आहेत.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे आणि २२१ दिवसांचे म्हणजेच एकूण २,४१२ दिवसांचे कामकाज हाताळले होते. १२ जुलै रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकूण सहा वर्षे सात महिन्यांचा कालावधी पूर्ण केला आहे. हा कालावधी एकूण २,४३० दिवसांचा होतो.
या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. ‘हा आम्हा कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हा केवळ एका विक्रमाचा टप्पा नाही तर महाराष्ट्रहितासाठी आपली दूरदृष्टी, अविरत परिश्रम आणि विकासाभिमुख कार्यशैली या बळावर सुरु असणाऱ्या विक्रमी वाटचालीत आपण गाठलेला एक माईलस्टोन आहे. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात यशाची नवीन शिखरे गाठत असून आपल्या नेतृत्वाचा आलेख आणि परीघ निरंतर विस्तारत राहो’ अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक केंद्रीय नेते, मंत्रीमंडळातील सहकारी आणि महायुतीतील मान्यवर नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
फडणवीस यांनी यापूर्वीच वसंतदादा पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मनोहर जोशी, शंकरराव चव्हाण यांना मागे टाकले होते. पुढील काही महिन्यात ते विलासराव देशमुख यांच्या २,६८६ दिवसांचा कार्यकाळ मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.
१२ जुलै २०२६ पर्यंतचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकूण कार्यकाळ
1) पहिला कार्यकाळ – ३१ ऑक्टोबर २०१४ – १२ नोव्हेंबर २०१९ = १,८३९ दिवस
2) दुसरा कार्यकाळ – २३ नोव्हेंबर २०१९ – २८ नोव्हेंबर २०१९ = ६ दिवस
3) तिसरा कार्यकाळ – ५ डिसेंबर २०२४ – १२ जुलै २०२६ = ५८५ दिवस
Marathi e-Batmya