एकनाथ शिंदे यांची माहिती, मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, भगवद्गीता, हनुमान चालीसा पोहोचवण्याच्या उपक्रमाचे कौतुक

महाराष्ट्र सदनात आयोजित ‘ईशान सेतू – सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण’ सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा, राष्ट्रीय समरसतेचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नाते दृढ करण्याचा ठाम संदेश दिला. परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्वतंत्र देव सिंह, विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, देशातील प्रमुख मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ ग्रंथप्रकाशनाचा नसून भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ऐतिहासिक क्षण असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज महाराष्ट्र सदनात केवळ ग्रंथांचे प्रकाशन होत नसून भारताचा आत्मा आणि संस्कृती देशाच्या हृदयातून ईशान्य भारतापर्यंत पोहोचत आहे. या उपक्रमामुळे केवळ भौगोलिक अंतर नव्हे तर मनामनांतील दुरावाही संपुष्टात येत असून ‘ईशान सेतू ट्रस्ट’ची ही खरी अर्थाने ‘भारत जोडो’ यात्रा असल्याचे नमूद केले.

स्वामी गोविंददेव गिरी महाराजांना कोटीशः वंदन करताना त्यांनी अमित शाह यांचे स्वागत केले तसेच ईशान सेतू ट्रस्टचे पदाधिकारी, विद्वान, अनुवादक, कार्यकर्ते आणि विशेषतः कॉर्पोरेट जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणारे राजेश साहनी यांचे अभिनंदन केले.

भारत हजारो वर्षांपासून संस्कृती, अध्यात्म, ज्ञान आणि संस्कारांच्या बळावर एकसंध राहिला असल्याचे सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, भाषा, वेशभूषा आणि लोकपरंपरा वेगळ्या असू शकतात; मात्र भारताचा आत्मा एकच आहे आणि तीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी आयुष्यभर सांस्कृतिक एकात्मतेसाठी कार्य केले असून ईशान सेतू ट्रस्ट हा त्यांच्या दूरदर्शी विचारांचा जिवंत आविष्कार आहे. ही संस्था ईशान्य भारतातील समृद्ध भारतीय वारसा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्याचा गौरव करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत झाली. नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवून ईशान्य भारतातील अनेक दशकांचा संघर्ष आणि तणाव कमी करण्यात यश आले. विविध सशस्त्र संघटनांशी ऐतिहासिक शांतता करार झाले, १०,८०० हून अधिक युवकांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नागरिकांच्या मृत्यूंमध्ये ८६ टक्क्यांनी घट झाली असून ईशान्य भारताला देशाच्या इतर भागांशी आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्याचे अमित शाह यांचे मिशन देशासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोविंददेव गिरी महाराज आणि अमित शाह यांच्या हस्ते रामायण, श्रीमद्भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या महान ग्रंथांचे ईशान्य भारतातील स्थानिक भाषांमधील अनुवाद प्रकाशित होणे ही भारताच्या सांस्कृतिक ऐक्यासाठी ऐतिहासिक घटना असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या मंत्राचे मूर्त स्वरूप या मंचावर दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

ईशान्य भारतातील विविध भाषा आणि लिपींची समृद्ध परंपरा अधोरेखित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कोणत्याही समाजाच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग त्याची मातृभाषा असते. त्यामुळे गीतेचा संदेश, प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि हनुमान भक्ती स्थानिक भाषांमध्ये घराघरात पोहोचल्यास धार्मिक जागृतीबरोबरच सांस्कृतिक आत्मविश्वास आणि राष्ट्रीय एकात्मताही अधिक बळकट होईल. ईशान्य भारतातील समृद्ध साहित्याचे हिंदी, मराठीसह इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतर व्हावे, अशी विनंती त्यांनी ईशान सेतू ट्रस्टला केली आणि या साहितिक  देवाणघेवाणीला महाराष्ट्र सरकारतर्फे पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्र ही संत, वीर आणि राष्ट्रनिर्मात्यांची भूमी असल्याचे सांगताना एकनाथ शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख केला. धर्म म्हणजे केवळ पूजा-पद्धती नसून समाजाला एका धाग्यात बांधण्याची शक्ती असल्याची शिकवण या महापुरुषांनी दिली असून ईशान सेतू ट्रस्ट हेच कार्य पुढे नेत असल्याचे स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, भारताची सांस्कृतिक एकता, राष्ट्रीय समरसता आणि ईशान्य भारताशी आत्मीय संबंध दृढ करणाऱ्या प्रत्येक उपक्रमात आपण तन, मन आणि धनाने कायम सोबत राहू, अशी ग्वाही देत त्यांनी हा कार्यक्रम केवळ संस्थेचा नसून राष्ट्रनिर्माणाचा महाअभियान असल्याचे सांगितले. महाराष्ट्राकडून ईशान्य भारताकडे धार्मिक श्रद्धा आणि आत्मीयतेचा हात पुढे करण्यासाठी याहून चांगला दिवस असू शकत नाही, असे ते म्हणाले.

ईशान्य भारतावरील प्रेम व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी काव्यपंक्ती सादर केल्या आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती लवकरच मणिपूरमध्ये उभारली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने हे मंदिर महाराष्ट्र आणि ईशान्य भारत यांच्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक नात्याचा मजबूत ‘ईशान सेतू’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

देशातील कोणताही प्रदेश स्वतःला कधीही वेगळा किंवा दूर समजू नये, असा संकल्प करण्याचे आवाहन करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कामाख्या आणि मुंबई ते मणिपूरपर्यंत प्रत्येक भारतीयाने स्वतःला एका विराट सांस्कृतिक कुटुंबाचा सदस्य समजले पाहिजे. हीच सनातन भारताची मूलभावना आणि राष्ट्राची आत्मा आहे.” सांस्कृतिक समन्वयाचा हा यज्ञ अखंड सुरू राहावा आणि भारताची सांस्कृतिक चेतना संपूर्ण जगाला प्रकाशमान करत राहावी, अशी प्रार्थना करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

पवित्र ग्रथांचे ईशान्य भारतात मोफत वितरण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली

ईशान्य भारतातील नागरिकांपर्यंत रामायण, श्रीमद्भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या पवित्र ग्रंथांचे मोफत वितरण करण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली असून, भारतीय संस्कृतीचा वारसा घराघरांत पोहोचविण्याच्या या अभियानात ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित व ३३८ संपर्कात नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध शासकीय यंत्रणा कार्यरत

नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *