मुख्यमंत्री असताना तुम्ही घरात बसलात! फेसबुकवरून राज्य चालत नाही, जनता संकटात असताना रस्त्यावर उतरावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताय… पण कमरेवर हात ठेवून उभं राहू नका, या आमच्यासारखे देणारे हात बना, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही — आम्ही ‘देना बँक’ आहोत, ते मात्र ‘लेना बँक’ आहेत अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
चाकणमधील या सभेत अतुल देशमुख आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, भगव्याचं ठाणे आहेच, पण आता भगव्याचं पुणे करायचं आहे! अतुल देशमुख यांच्या प्रवेशामुळे उत्तर पुण्याची ताकद वाढली आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. आता गुलाल उधळण्याची तयारी करा! विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्री असूनही घरात बसलात. राज्य संकटात असताना फेसबुक लाईव्हवरून भाषणं देत बसलात. जनतेला त्याचा काय उपयोग झाला? आम्ही कोल्हापूरचा पूर असो, इर्शाळवाडीचं दु:ख असो स्वतः घटनास्थळी जाऊन उभे राहिलो. निर्णय घेतले, निधी दिला, लोकांना दिलासा दिला. आम्ही काम करतो, फक्त टीका नाही करत अशी टोलाही यावेळी लगावला.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, कर्जमाफीचं वचन पाळलं, लाडकी बहिण योजना सुरू केली, महिलांना अर्धं तिकीट दिलं, शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान दिलं. आम्ही बोलत नाही, थेट देतो. काही लोकं फक्त बोलतात, फोटो काढतात, पोस्ट टाकतात… पण जनतेला काही मिळत नाही असेही यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतच्या महायुतीवरही आत्मविश्वास व्यक्त केला. “निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल आणि निकाल भगव्याचाच येणार! विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे, त्यामुळे गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हा.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, काही जण आम्हाला भकास म्हणतात. अरे, अडीच वर्षांत महाराष्ट्र पालथा घातला! पायाला भिंगरी लावली! मुख्यमंत्री राहताना तुम्ही काय केलंत? आम्ही सर्वसामान्यांसाठी काम केलं. महिलांना, शेतकऱ्यांना, कामगारांना दिलासा दिला. जनतेचा विश्वास मिळवला असल्याचा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.
सभेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ऐक्य, कार्यकर्त्यांचं महत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांवर ठाम राहण्याचं आवाहन केलं.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा पक्ष कोणाचा मालकी हक्क नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे! जो काम करेल, तो पुढे जाईल. बाळासाहेबांनी सांगितलं शिवसेनेतील सगळ्यात मोठं पद म्हणजे शिवसैनिक! आम्ही ते जपलंय आणि जपत राहू. आमचं सरकार काम करणाऱ्यांचं आहे. फक्त बोलणाऱ्यांचं नाही असेही यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, पुणे जिल्ह्यासाठी पाच हजार कोटींच्या रस्त्यांच्या योजना, आळंदीतील संत स्मारकासाठी २५ कोटी, महिलांसाठी बचत गट अनुदान, पाणीपुरवठा प्रकल्प, ट्रॅफिकमुक्त चाकण योजना, मेट्रोचा डीपीआर हे सर्व सरकारनं मंजूर केल्याचे सांगितले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, शिवसेना सचिव राम रेपाळे, इरफान सय्यद, भगवान पोखरकर, नितीन गोरे, मनिषा गोरे, सारिका पवार, सुलभा उबाळे, निलेश पवार, प्रकाश वाडेकर, राहुल चव्हाण आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच चाकणमधील असंख्य नागरिक उपस्थित होते.
Marathi e-Batmya